कोरोनानंतर आता मंकीपॉक्सने जगभरात खळबळ माजविण्यास सुरुवात केली आहे. भारतात कमी फरकाने चार रुग्ण सापडले आहेत. एक तर शिमल्याला जाऊन पुन्हा दिल्लीतील स्वगृही परतला होता. यामुळे आरोग्य यंत्रणेचे धाबे दणाणले आहेत. अशातच मंकीपॉक्सच्या लसीबाबत चर्चा सुरु झाली आहे.
कोरोनावर लसीमुळेच विजय प्राप्त करता आला होता. यामुळे भारतीय फार्मास्युटिकल इंडस्ट्री या विषाणूजन्य आजारासाठी लस आणि औषधे विकसित करण्याचा विचार करत आहे. भारतात कोव्हिशिल्ड ही लस विकसित करण्यात सीरम इन्स्टिट्यूटचा मोठा वाटा होता. ब्रिटनच्या कंपनीने जरी ही लस बनविली असली तरी त्याच्या मोठ्या प्रमाणावर चाचण्या सीरमने घेतल्या होत्या. यानंतर ही विकसित झालेली लस भारतीयांना तसेच जगभरात पुरविण्यात आली होती.
सीरमचे अदर पुनावाला यांनी सांगितले की, त्यांचा जागतिक भागीदार नोवावॅक्ससोबत मंकीपॉक्सची एमआरएनए लस विकसित करण्याचा विचार सुरु आहे. याचबरोबर डेन्मार्कची कंपनी Bavarian Nordic द्वारे निर्मित स्मॉलपॉक्सची लस आयात करण्याचा देखील विचार सुरु आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार कांजिण्यावरील लस मंकीपॉक्सवर प्रभावी ठरू शकतात. ही लस मंकीपॉक्स झालेल्या रुग्णाच्या थेट संपर्कात आलेल्या लोकांनाच दिली जावी असेही डब्लूएचओने म्हटले आहे. मात्र, डब्ल्यूएचओने सामुहिक लसीकरणाची शिफारस केलेली नाही.
ख्रिश्चन मेडिकल कॉलेज, वेल्लोर येथील प्रख्यात मायक्रोबायोलॉजिस्ट आणि व्हायरोलॉजिस्ट, प्रोफेसर डॉ. गगनदीप कांग म्हणाले की, कांजिण्यांची लस मंकीपॉक्सपासून संरक्षण करते, परंतु कोणतीही भारतीय कंपनी स्मॉलपॉक्सची लस बनवत नाही. मंकीपॉक्सवर टेकोविरिमैट लस देण्याची शिफारस यूरोपीय मेडिसिन एजन्सीने केली आहे.