देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस अधिकाधिक वाढ झालेली पाहायला मिळत आहे. संसर्ग कमी होण्याच्या दृष्टीनं प्रशासनाकडून कठोर पाऊलं उचलण्यात येत आहे. दरम्यान कोरोनाच्या प्रसाराबाबत एक मोठी माहिती समोर येत आहे. कोरोनाबाबत नीति आयोगाचे सदस्य डॉ. वीके पॉल यांनी दिलेल्या माहितीनुसार पुढचे चार आठवडे अतिशय महत्त्वाचे असणार आहेत. तर, आयआयटी कानपूर (IIT Kanpur) टीमनं गणितीय मॉडेलच्या आधारे कोरोना २० ते २५ एप्रिलदरम्यान कोरोनाचा उद्रेक होण्याची शक्यता असल्याचं म्हटलं आहे.
आयआयटी कानपूरचे प्राध्यापक मनिंद्र अग्रवाल यांनी सांगितले की, ''कोरोनाची दुसरी लाट आधीपेक्षा अधिक भयंकर असल्याचं चित्र आहे. 15 एप्रिल म्हणजेच गुरुवारी कोरोनाच्या रुग्णसंख्येनं नवीन उच्चांक गाठला आहे. अजूनही संकट कमी झालेलं नाही. आमच्या तज्ज्ञांनी टिम कोरोनावर गणितीय मॉडेलच्या आधारे लक्ष ठेवूनआहे. यानुसार, २० ते २५ एप्रिलदरम्यान कोरोनाचा धोका वाढणार आहे. यानंतर काही प्रमाणात दिलासादायक स्थिती उद्भवू शकते.''
पुढे त्यांनी सांगितले की,'' २५ एप्रिलनंतर कोरोनाच्या संसर्गापासून दिलासा मिळण्यास सुरुवात होईल आणि अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत घट होण्याची शक्यता आहे. मे अखेरपर्यंत स्थिती सामान्य होण्यास सुरुवात होईल. देशभरातील सर्वच राज्यांमध्ये जवळपास स्थिती सामान्य दिसून येईल. जिथे कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे, तिथेही मे अखेरपर्यंत परिस्थिती सुरळीत व्हायला सुरू होईल. सध्याची लाट पहिल्या लाटेपेक्षा वेगळी आहे, कारण यावेळी दररोजचा मृत्यूदर बाधितांच्या प्रमाणानुसार मागील वेळीपेक्षा कमी आहे. लस आल्यानंतर लोकांनी नियमांच्या पालनाबाबत निष्काळजीपणा केल्यामुळे संसर्गाचं प्रमाण वाढलं.'' लस घेतली तरी कोरोना होतोच, मग कशासाठी घ्यायची लस?; डॉ. संजय ओक यांनी सांगितले अनुभवाचे बोल
दरम्यान गुरुवारी ६१ हजार ६९५ रुग्ण आणि ३४९ मृत्यूंची नोंद झाली. आता राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ३६ लाख ३९ हजार ८५५ झाली असून बळींचा आकडा ५९ हजार १५३ इतका आहे. सध्या राज्यात ६ लाख २० हजार ६० रुग्ण उपचाराधीन असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे. राज्यात मागील २४ तासांत ५३ हजार ३३५ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत एकूण २९ लाख ५९ हजार ५६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८१.३ टक्के आहे.
येत्या ४-५ दिवसात मोठ्या प्रमाणात रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध होणार; कोविड-19 टास्क फोर्सची माहिती
सध्या राज्यातील मृत्युदर १.६३ टक्के आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २ कोटी ३० लाख ३६ हजार ६५२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १५.८ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ३५ लाख ८७ हजार ४८७ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत, तर २७ हजार २७३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.