लंडन - कोरोना विषाणूविरूद्ध लस आणि लसीचा बूस्टर डोसचे फायदे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहेत. एका नवीन स्टडीत असे दिसून आले आहे की, ज्या लोकांनी कोरोनाची लस आणि बूस्टर डोस घेतला आहे. ते डेल्टाच्या तुलनेत सुमारे 3 दिवस लवकर ओमायक्रॉनपासून बरे होतात. ओमायक्रॉनच्या रुग्णांमध्ये वास घेण्याच्या क्षमतेवरही परिणाम होण्याची शक्यता कमी असते. मागील स्टडीत देखील पुष्टी केली होती की, ओमायक्रॉन डेल्टापेक्षा कमी प्राणघातक आहे. स्टडीदरम्यान, असे आढळून आले की डेल्टाच्या तुलनेत ओमायक्रॉन रूग्णांमध्ये हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याचे प्रमाण 25 टक्के कमी होते. ब्रिटनमधील 63 हजार लोकांची स्टडी करून शास्त्रज्ञांनी हे निष्कर्ष काढले आहेत. ही स्टडी जून 2021 ते जानेवारी 2022 या कालावधीत करण्यात आली.
मेडिकल जर्नल लॅन्सेटमध्ये शुक्रवारी प्रकाशित झालेल्या या स्टडीत 16 ते 99 वयोगटातील लोकांमध्ये डेल्टा आणि ओमायक्रॉनमुळे उद्भवणारी लक्षणे पाहण्यात आली. यासाठी ZOE नावाच्या मोबाईल अॅपची मदत घेण्यात आली. ज्यांना दोन कोरोना लसीचे डोस मिळाले होते आणि त्यांनी बूस्टर डोस देखील घेतला होता, त्यांच्यामध्ये ओमायक्रॉनची लक्षणे सरासरी 4.4 दिवसांत संपली, तर डेल्टा ग्रस्त रुग्णांना बरे होण्यासाठी 7.7 दिवस लागले होते, असे स्टडीत असे दिसून आले आहे. म्हणजेच ओमायक्रॉन रुग्ण डेल्टाच्या तुलनेत सरासरी 3.3 दिवस लवकर बरे झाले. लसीचे फक्त दोन डोस घेतलेल्या लोकांमध्ये, ओमायक्रॉनची लक्षणे दूर व्हायला 8.3 दिवस लागले. या लोकांमध्ये डेल्टाची लक्षणे 9.6 दिवसांत बरी झाल्याचे दिसून आले.
स्टडीदरम्यान, असे दिसून आले की डेल्टा रुग्णांमध्ये 53 टक्के रुग्णांच्या तुलनेत ओमायक्रॉनने ग्रस्त असलेल्या 17 टक्के रुग्णांमध्ये वास घेण्याची क्षमता प्रभावित झाली होती. परंतु काही प्रकरणांमध्ये ओमायक्रॉनचा लोकांवर अधिक प्रभाव दिसून आला. ओमायक्रॉन रुग्णांमध्ये घसा खवखवण्याचा धोका 55 टक्के जास्त असल्याचे दिसून आले. त्याचप्रमाणे आवाजावर परिणाम होण्याच्या घटनांमध्ये 24 टक्क्यांची वाढ दिसून आली. ही स्टडी करणार्या लंडनच्या किंग्स कॉलेजच्या क्रिस्टीना मेनी यांनी सांगितले की, कोरोनाच्या डेल्टा आणि ओमायक्रॉन व्हेरिएंटची तुलना करण्यासाठी इतक्या लोकांवर केलेली ही पहिलीच स्टडी होती, ज्याचे द लॅन्सेटने पीअर रिव्ह्यू केले होते. जेव्हा ही स्टडी करण्यात आली, तेव्हा ओमायक्रॉनचे BA.1 रुग्ण जास्त आढळून येत होते.