कोरोनावर गोळी कधी येणार असा प्रश्न सर्वांच्या मनात होता. मात्र या प्रश्नाचं उत्तर आता समोर आलं आहे. सध्या देशाला तिसऱ्या लाटेचा धोका आहे. अशातच आता दिलासादायक बातमी समोर आली आहे. हैदराबादमध्ये ऑप्टीमस फार्मा आणि फायझरच्या पॅक्स्लोव्हिडनं कोरोनावरील गोळी लाँच केलीय. मॉलकोवीर 200 एमजी असं या औषधाचं नाव आहे. मुख्य म्हणजे आता ही गोळी बाजारातही तुम्हाला मिळणार आहे. नवीन वर्षात सोमावरपासूनच ही गोळी डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन प्रमाणे उपलब्ध होणार आहे. यातल्या एका गोळीची किंमत ६३ रुपये इतकी असेल.
पाच दिवस दोन गोळ्यांचा डोस असं हे प्रमाण असणार आहे. कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांवर या गोळीची यशस्वी चाचणी झाल्यानंतर ही गोळी लाँच करण्यात आली आहे. दरम्यान यापूर्वी अमेरिकन फार्मास्युटिकल दिग्गज कंपनी फायझरने अँटीव्हायरल कोविड-19 औषध अधिक परवडणारे बनवण्यासाठी करार जाहीर केला आहे. या डीलपूर्वी, या औषधाला चाचणी पास करून नियामक मान्यता मिळवावी लागणार आहे.
जर्मन लॅब बायोएनटेकसह अँटी-कोविड लस निर्माता फायझरने सांगितलं होतं की, त्यांनी रॉयल्टीशिवाय पॅक्सलोव्हिड गोळीचे उप-परवाना उत्पादन करण्यासाठी जेनेरिक औषध निर्मात्यांशी करार केला आहे. त्यामुळे, ग्लोबल मेडिसिन्स पेटंट पूल (MPP) सोबतच्या या करारामुळे जगातील ५३ टक्के लोकसंख्येचा समावेश असलेल्या ९५ कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये हे औषध कमी किमतीत उपलब्ध होईल. हे औषध एचआयव्ही औषध रिटोनावीरसह घेतलं जाईल.