नवी दिल्ली - ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (DGCI) कोव्हॅक्सिन आणि कोविशील्डचा मिक्स डोस देण्यासंदर्भात अभ्यास करण्यासाठी परवानगी दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अभ्यास आणि याचे क्लिनिकल ट्रायल वेल्लोर येथील ख्रिश्चन मेडिकल कॉलेजच्या वतीने आयोजित केले जातील. जगातील काही मोठ्या देशांतही यासारखे प्रयोग सुरू झाले आहेत. (Corona Vaccine drugs controller general of india gives permission for study on covishield and covaxin mixing)
सीडीएससीओच्या विषय तज्ज्ञ समितीने 29 जुलैला दोन्ही लसींच्या मिश्रणासाठी अभ्यासाची शिफारस केली होती. मात्र, हा अभ्यास भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (ICMR) अभ्यासापेक्षा वेगळा असेल. ICMR च्या अभ्यासात दोन कोरोना लसी एकत्रित केल्यास अधिक चांगले संरक्षण आणि रोगप्रतिकारक्षमता मिळते, असे म्हटले आहे.
ICMR ने काय म्हटले होते -आयसीएमआरच्या अभ्यासात आढळून आले आहे की, कोविशील्ड आणि कोव्हॅक्सीनचा मिक्स डोस दिल्यास, केवळ कोरोना विरोधातच चांगली रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होत नाही, तर हे कोरोनाच्या व्हेरिएंट्सवरही परिणाम कारक आहे. या अभ्यासात एकूण 98 लोकांचा समावेश करण्यात आला होता. यांतील 40 लोकांना कोविशील्ड आणि 40 लोकांना कोव्हॅक्सीनचे दोन्ही डोस देण्यात आले होते आणि 18 लोक असे होते, ज्यांना पहिला डोस कोविशील्ड आणि दुसरा डोज कोव्हॅक्सीनचा देण्यात आला होता.
'या' देशांतही मिक्स व्हॅक्सीनचा फॉर्म्युला -रशिया- रशिया डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडने स्वतःला लस कॉकटेलमधील अव्वल म्हटले आहे. रशियाकडून Sputnik-V आणि AstraZenecaच्या डोसचे कॉकटेल तयार करण्यात आले. यात कुठलेही मोठे दुष्परिणाम दिसून आले नाहीत. या महिन्याच्या शेवटी यासंदर्भात अंतिम निकाल जाहीर होईल.
डेन्मार्क- येथे करण्यात आलेल्या चाचणीत, अॅस्ट्राझेनेकाचा पहिला डोस दिल्यानंतर, दुसरा डोस फायझर अथवा मॉडर्ना लसीचा देण्यात आल्यास कोरोनापासून चांगल्या प्रकारचे संरक्षण होते.
दक्षिण कोरिया - येथे करण्यात आलेल्या अभ्यासानुसार, असे समोर आले आहे, की अॅस्ट्राझेनेका लसीचा पहिला डोस आणि फायझरचा दुसरा डोस घेतल्यास, अॅस्ट्राझेनेकाच्या दोन्ही डोसच्या तुलनेत 6 पट अधिक चांगले संरक्षण मिळते.
याशिवाय, जर्मनी, थायलंड, कॅनडा आणि स्पेन या देशांतही करोनाचा सामना करण्यासाठी वेगवेगळ्या लसींचे डोस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जगातील अनेक देशांत कोरोनाचा सामना करण्यासाठी वेगवेगळ्या रणनीतीवर काम सुरू आहे.