(Image Credit- AP)
कोरोनाच्या माहामारीत आता हळूहळू अनेक देशांनी अनलॉकची सुरूवात केली आहे. तर फ्रान्स, जर्मनी आणि इतर काही देशात कोरोनाने कहर केल्यामुळे पुन्हा लॉकडाऊन करण्याची स्थिती उद्भवली आहे. कोरोनाची लस कधी उपलब्ध होणार याची सगळ्यांनाच प्रतिक्षा आहे. दरम्यान जॉन्सन अॅण्ड जॉन्सन कंपनीच्या लसीच्या चाचणीबाबत एक मोठी माहिती समोर येत आहे. ऑक्सफोर्डनंतर आता जॉन्सन अॅण्ड जॉन्सन कंपनीने एक मोठा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी अमेरिकन सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अॅण्ड प्रिव्हेन्शन (CDC) च्या बैठकीत कंपनीने याबाबत महत्वाची माहिती दिली आहे.
कंपनीकडून लवकरच १२ ते १८ वर्ष वयोगटातील तरूणांवर कोरोना लसीची चाचणी केली जाणार आहे. जॉन्सन अॅण्ड जॉन्सन कंपनीचे डॉ. जेरी सेडॉफ यांनी दिलेल्या माहितीनुसार सुरक्षेचे सर्व निकष डोळ्यासमोर ठेवून युवक आणि लहान मुलांवर कोरोनाच्या लशीची चाचणी करण्यासाठी नियोजन आखण्यात आलं आहे. सप्टेंबर महिन्याच्या शेवटापर्यंत जवळपास ६० हजार स्वयंसेवकांवर चाचणी करण्यात आली होती.
तिसऱ्या टप्प्यातील चाचणी ही वयोवृद्धांवर करण्यात आली होती. या चाचणीदरम्यान एका महिला स्वयंसेवकावर साईड इफेक्टस दिसून आल्यामुळे ही चाचणी काही वेळासाठी थांबवण्यात आली. मात्र एका आठवड्यापूर्वी पुन्हा एकदा चाचणी करण्यास सुरुवात करण्यात आली असून आता ही कंपनी तरूणांवर कोरोनाच्या लशीची चाचणी करण्याची योजना आखत आहे.
रॉयटर्सच्या वृत्तानुसार, जॉन्सन अॅण्ड जॉन्सन १२ ते १८वर्षे वयोगटातील त्यांच्या प्रायोगिक कोविड -१९ लसची शक्य तितक्या लवकर चाचणी सुरू करण्याचा विचार करीत आहेत. जॉन्सन अँड जॉन्सनचे डॉ. जेरी सॅडॉफ यांनी शुक्रवारी सांगितले की, “शक्य तितक्या लवकर आम्ही मुलांमध्ये जाण्याची योजना आखली आहे परंतु सुरक्षिततेच्या दृष्टीने आम्ही काळजीपूर्वक विचार केला आहे.” याआधी एका निवेदनात तज्ज्ञ म्हणाले होते की तरूणांची लोकसंख्या त्याच्या चाचण्यांमध्ये समाविष्ट करण्याबाबत सध्या भागीदारांशी चर्चा केली जात आहे. औषध निर्माता फायझर इंक कंपनीने कोविड -१९ या लसीची चाचणी घेण्यास आधीच सुरुवात केली आहे. ही जर्मनीच्या बायोटेक कंपनीसह भागीदारांनी विकसित केलेली लस आहे. चिंताजनक! कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर; लॉकडाऊनच्या तयारीत आहेत 'हे' ३ देश
दरम्यान देशातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९१.१५ टक्क्यांवर पोहोचले आहे, तर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ६ लाखांहून कमी झाली आहे. शुक्रवारी ४८,६४८ नवे कोरोना रुग्ण सापडले असून, एकूण रुग्णसंख्या ८० लाख ८८ हजार झाली आहे. या संसर्गातून ७३ लाख ७३ हजारांहून अधिक जण बरे झाले आहेत. केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना रुग्णांचा मृत्यूदर १.५० टक्के इतका कमी राखण्यात भारताला यश आले आहे. कोरोना रुग्णांची एकूण संख्या ८०,८८,८५१, तर बरे झालेल्यांची संख्या ७३,७३,३७५ झाली आहे. या आजाराने आणखी ५६३ जण शुक्रवारी मरण पावले असून, बळींचा एकूण आकडा १,२१,०९० झाला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर, गरज असेल तरच घराबाहेर पडा; एम्सच्या तज्ज्ञांची धोक्याची सुचना
उपचार घेत असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या शुक्रवारी ५,९४,३८६ होती. गुरुवारपेक्षा ती ९३०१ने कमी झाली आहे. उपचार सुरू असलेल्या कोरोना रुग्णांचे प्रमाण एकूण रुग्णसंख्येच्या ७.३५ टक्के आहे. जगातील सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या देशात अमेरिका प्रथम क्रमांकावर आहे. तिथे ९२ लाख १२ हजारांपेक्षा अधिक रुग्ण आहेत. काळजी वाढली! लक्षण नसलेल्या कोरोना रुग्णांच्या चिंतेत वाढ; एंटीबॉडीबाबत तज्ज्ञांचा खुलासा