कोरोनाने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. यामुळे अनेक देशांत लसीकरण आणि बूस्टर डोसच्या मोहीमाही राबवल्या जात आहेत. यातच जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) टेन्शन वाढवणारा इशारा दिला आहे. सध्याच्या लसींचा बूस्टर डोस पुरेसा नाही आणि संसर्ग टाळण्यासाठी प्रभावी लस विकसित करणे गरजेचे आहे, असे डब्ल्यूएचओने म्हटले आहे. डब्ल्यूएचओच्या तज्ज्ञांनी मंगळवारी इशारा दिला आहे, की सध्याच्या लसींचा बूस्टर डोस (Booster Dose) हा नव्या व्हेरिअंट विरोधात प्रभावी रणनिती नाही.
प्रभावी लस तयार करणे आवश्यक -जागतिक आरोग्य संखटनेच्या (WHO) टेक्निकल अॅडव्हायजरी ग्रुपच्या (WHO Technical Advisory Group) तज्ज्ञांच्या एक समूहाने कोरोना लसीच्या कंपोझिशन (TAG-Co-VAC)संदर्भात म्हटले आहे, की सध्याच्या लसी गंभीर आजार आणि व्हेरिअंट ऑफ कंसर्नमुळे (Variants of Concern) होणाऱ्या मृत्यूंविरोधात चांगली सुरक्षितता प्रदान करत आहेत. मात्र, आपल्याला भविष्यात अशा लसी तयार कराव्या लागतील, ज्या प्रभावीपणे संसर्ग रोखू शकतील.
नव्या लसींच्या माध्यमानेच गंभीर आजार आणि मृत्यू चांगल्या प्रकारे रोखले जाऊ शकतील. एवढेच नाही, तर पुढील सहा ते आठ आठवड्यांत युरोपातील जवळपास 50 टक्के लोक कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिअंटने संक्रमित झालेले असतील, असेही WHO ने म्हटले आहे.
सध्याच्या लसींचे बूस्टर डोस अपुरे - कोरोना व्हॅक्सीन संदर्भातील WHO च्या टेक्निकल अॅडव्हायजरी ग्रुपने (TAG-Co-VAC) एका निवेदनात म्हटले आहे की, मूळ व्हॅक्सीन फॉर्म्युलेशनच्या बूस्टर डोसवर आधारित लसीकरण धोरण योग्य अथवा टिकाऊ असण्याची शक्यता नाही. सुरुवातीच्या डेटावरून सूचित होते, की जे लोक नव्या Omicron व्हेरिअंटने संक्रमित झाले आहेत, त्यांचा कोरोनापासून बचाव करण्यात विद्यमान लसी कमी प्रभावी होत्या. यामुळे, अशा लसी विकसित करणे आवश्यक आहे, ज्या केवळ गंभीर आजारी पडण्यापासूनच संरक्षण करणार नाहीत, तर संक्रमण आणि प्रसारही अधिक चांगल्या प्रकारे रोखू शकतील.