वॉश्गिंटन – जगभरासह भारतात कोरोनच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. अलीकडे देशातील रुग्णसंख्या कमी होत असली तरी कोरोनाचा धोका टळलेला नाही. भारतात डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रुग्ण आढळल्याने चिंता वाढली आहे. हा व्हायरस वेगाने पसरत गेल्यास देशात कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते अशी भीती तज्त्रांनी व्यक्त केली आहे. यातच जागतिक आरोग्य संघटनेने कोविड १९ लस ही डेल्टा व्हेरिएंटवर कमी प्रभावी ठरत असल्याचा दावा केला आहे त्यामुळे लसीकरणानंतरही लोकांना कोरोनाची भीती सतावत आहे.
परंतु लसीकरणामुळे मृत्यूचा धोका आणि गंभीर आजारापासून वाचू शकतं असंही जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलं आहे. WHO महामारी तज्ज्ञांचे म्हणणं आहे की, अनेक म्यूटेशन झाल्यामुळे लसीचा कोरोना विषाणूविरोधात प्रभाव कमी होऊ शकतो. भारतात सापडलेला डेल्टा प्लस व्हेरिएंट हा डेल्टा व्हेरिएंटच्या म्यूटेशनमुळे तयार झाला आहे. व्हायरसमध्ये बदल झाल्याने तो लोकांमध्ये सहजपणे पसरू शकतो.
रशियाचा दावा स्पुतनिक(Sputnik) लस प्रभावी
रशियाने मंगळवारी दावा केलाय की, त्यांची स्पुतनिक व्ही लस ही भारतात सर्वात आधी सापडलेल्या डेल्टा व्हेरिएंटविरोधात प्रभावीशील आहे. कोणत्याही इतर लसींच्या तुलनेत स्पुतनिक लस जास्त संक्रमण आणि धोकादायक व्हेरिएंट्सच्या विरोधात जास्त प्रभावी ठरते. याबाबत गमलेया सेंटर स्टडी रिव्यू जर्नलमध्ये प्रकाशित झालं आहे.
लसीचे दोन्ही डोस गरजेचे
डेल्टा स्वरुपाचा विचार केला तर तो अशा लोकांना संक्रमित करत आहेत ज्यांनी कोविड १९ लसीचा एक डोस घेतला आहे. त्यामुळे त्याचे संक्रमण वाढत आहे. इंग्लंडच्या आरोग्य विभागानुसार, ज्या लोकांनी फायझर लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत त्यांचा कोरोनातून ८८ टक्के बचाव होत आहे. तर फायझर अथवा एस्ट्राजेनेका लसीचा केवळ एक डोस घेतला आहे. ते फक्त ३३ टक्के वाचू शकतात.
महाराष्ट्रात डेल्टा प्लसचे २१ रुग्ण आढळले
राज्यात डेल्टा प्लस(Delta Plus Variant) विषाणूची लागण झालेले २१ रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. त्यातील ९ रुग्ण रत्नागिरी येथील जळगाव येथील ७, मुंबई २ आणि पालघर, सिंधुदुर्ग, ठाणे येथील प्रत्येकी १ रुग्ण आहे.या विषाणूच्या तपासणीसाठी राज्यभरातून सुमारे ७५०० नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली.
या संदर्भात अधिक माहिती देतांना राजेश टोपे म्हणाले, महाराष्ट्राने जिनोमिक सिक्वेनसिंगच्या संदर्भात निर्णय घेतला आणि प्रत्येक जिल्ह्यातील १०० सॅम्पल घेण्याबाबत कार्यवाही सुरू केली आणि या महत्त्वाच्या कार्यवाहीसाठी सी एस आय आर आणि आयजीआयबी या महत्त्वाच्या संस्थेचा सहभाग यामध्ये घेतला आहे. एनसीडीसीचे देखील सहकार्य घेण्यात आहे. १५ मे पासून ७५०० नमुने घेण्यात आले आणि त्यांचे स्क्विन्सिंग करण्यात आले. ज्यामध्ये डेल्टा प्लसचे साधारणपणे २१ केसेस आढळून आले आहेत असं त्यांनी सांगितले.