नवी दिल्ली – चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोनानं अवघ्या जगाला संकटात ओढलं आहे. कोरोनामुळे अनेकांची जीव गेले, लॉकडाऊनमुळं देश बंद झाला, रोजगार गेले, लोकांचे आयुष्य कोरोनामुळे बदलून गेले. आजही लोकांच्या मनात कोरोनाची धास्ती कायम आहे. देशात हळूहळू अनलॉक प्रक्रिया सुरु झाली आहे. कोरोना रुग्णांची संख्या घटत आहे. मात्र कोरोनाचं संकट टळलं नाही.
कोरोना महामारीवर नियंत्रण आणण्यासाठी जगभरात कोरोनावरील लस शोधण्याचा प्रयत्न सुरु आहे. यातच कोरोना लस बनवणारी कंपनी सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदार पूनावाला यांनी गुरुवारी जनतेला आनंदाची बातमी दिली आहे. आरोग्य कर्मचारी आणि ज्येष्ठ नागरिकांना फेब्रुवारी २०२१ पर्यंत कोरोनाची कोवाशिल्ड लस उपलब्ध होणारआहे, तर सर्वसामान्य जनतेसाठी एप्रिल २०२१ पर्यंत कोरोनाची लस उपलब्ध होण्याची शक्यता असल्याचं पूनावाला यांनी सांगितले.
त्याचसोबत कोरोना लसीचे २ डोस जनतेला परवडणाऱ्या किंमतीत मिळणार आहे. या २ डोसची किंमत १ हजार रुपये असेल, आतापर्यंत घेतलेल्या चाचणीचे अहवाल सकारात्मक आले असून आता अंतिम चाचणीच्या अहवालाची प्रतिक्षा केली जात आहे. तर २०२४ पर्यंत संपूर्ण भारतातील नागरिकांना लसीकरण केलं जाईल. भारतातील प्रत्येक व्यक्तीला लस टोचण्यासाठी २ ते ३ वर्ष लागू शकतात असंही अदार पूनावाला यांनी सांगितले.
कोरोना लस वितरणाची तयारी
भारतात कोरोना लसीच्या साठवणूकीची व्यापक स्वरूपात तयारी केली जात आहे. केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार अनेक राज्यांमध्ये कोल्ड स्टोरेजची व्यवस्था पाहिली जात आहे. यासाठी केंद्र सरकारला राज्याकडूनही मदत मिळत आहे. राज्य सरकारने दिलेल्या माहितीनसार केंद्राकडून फिरते रिफ्रेजरेटर, कूलर आणि मोठे रेफ्रिजेरेटर याशिवाय 150 डीप फ्रीजरर्सची व्यवस्था केली आहे. राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांवर मोठ्या प्रमाणात रेफ्रिजरेटर तयार केले जात आहेत. याशिवाय मेंटेनेसचं कामही केलं जात आहे.
दोन कंपन्या फायजर आणि बायोएनटेक यांनी दिलेल्या माहितीनुसार या वर्षाच्या शेवटापर्यंत ५ कोटी लसीचे डोस पुरवले जातील तसंच २०२१ च्या शेवटापर्यंत १.३ अरब डोसचा पुरवठा केला जाणार आहे. प्रत्येक व्यक्तीला दोन डोस देण्याची गरज असेल. म्हणजेच यावर्षी २.५ कोटी लोकांना तर पुढच्यावर्षी ६५ कोटी लोकांना कोरोनाची लस घेता येईल.