लोकमत न्यूज नेटवर्क
एकीकडे कोरोनाचे आकडे नियमित वाढत आहेत. नियमित होणाऱ्या मृत्यूच्या संख्येत वाढ होत असतानाच चिंता, भीती, नैराश्य, नकारात्मक अशा वातावरणात व या समस्यांमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. भीतीपोटी अनेकांना मोठा धक्का बसून त्यांना जीव गमवावा लागत असल्याची काही उदाहरणे समोर येत आहेत. अशा स्थितीत अतिकाळजी किंवा निष्काळजीपणा यातील मध्य साधून आणि सकारात्मकता शोधून आपले मानसिक आरोग्य चांगले ठेवा, असा सल्ला शहरातील काही मानसोपचार तज्ज्ञांनी दिला आहे.
निष्काळजीपणा धोकादायक
काही जण अगदीच बिनधास्त व कुठलेच नियम न पाळता मुक्त संचार करीत असल्याने अशा लोकांमुळे कोरोनाचा संसर्ग अधिक वाढत आहे. आम्हाला काही होणार नाही, आम्हाला का कोरोना झालाय का? अशा अनेक गैरसमजातून त्यांचा बिनधास्तपणा वाढतो, तो आताच्या स्थितीत अधिक धोकादायक आहे.
अतिकाळजी धोकादायक
कोरोनाचे वेळीच निदान झाल्यास वेळीच उपचार सुरू झाल्यास पुढील धोके टळतात, हे वारंवार समोर आले आहे. त्यामुळे मला कोरोना झाला म्हणजे मी संपलो, आता कसे होईल, सगळे संपले या भावना व अवास्तव भीती रुग्णाला अधिक धोकादायक ठरू शकते, यामुळे चिंता, नैराश्य अशा भावना वाढू शकतात. झोप न येणे, नकारात्मकता वाढणे या गोष्टी होऊ शकतात. या गोष्टी नंतर तुमच्या शारीरिक आरोग्यावर घातक परिणाम करू शकतात.
भीती वाटतेय तर हे करा
कोरोनाची लक्षणे सर्वश्रुत आहेत. यातील लक्षणे जाणवल्यानंतर घाबरून न जाता थेट तपासणी करून घ्या. जे असेल ते एकदाचे स्पष्ट झाले म्हणजे मनातील भीती तात्काळ निघू शकते. आणि बाधित आढळून आलाच तरी न घाबरता डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य उपचार घेतल्यास काहीच होणार नाही, ही सकारात्मकता ठेवा. कोरानात मृत्यूदर हा कमी आहे. पण यासाठी वेळीच उपचार हवे.
या आहेत काही टीप्स
वारंवार कोरोनाबाबतच विचार करू नका
एखाद्या चांगल्या छंदात स्वत:ला गुंतवून ठेवा
मन, विचार नेहमी प्रसन्न ठेवा
ताणतणावावर मात करीत सक्षमपणे मार्ग काढता येतो, हा विचार नेहमी मनात ठेवा
कोरोनाच्या वारंवारच्या आकडेवारीपासून लांब रहा
पुरेशी काळजी घ्या, पुरेसी झोप घ्या, प्रतिकारशक्ती वाढविण्यावर भर द्या, योग्य पौष्टिक आहार घ्या.
गरजूंना मदत करा, याने तुमचा आत्मविश्वासही वाढेल.
...........................
सध्या कोरोनाचे प्रमाण खूप वाढले आहे. यात असुरक्षितता आणि चिंता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र, निष्काळजीपणाने वागणाऱ्या नागरिकांमुळे कोरोनाचा संसर्ग अधिक वाढला आहे. अशा स्थितीत अवास्तव भीती न बाळगता स्वत:ची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. चिंता, नैराश्य वाटत असेल तर तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. सकारात्मका शोधा, नवी संधी शोधा, एखादा छंद जोपासा.
- डॉ. प्रदीप जोशी, मानसोपचारतज्ज्ञ
.........................
गैरसमज, बेधडकपणा ही कोरोनाच्या बाबतीत अक्षम्य चूक आहे. कोरोना झाल्यानंतर मग अनेक बाबींच्या बाबतीत तणाव घेतला जातो. त्यामुळे निष्काळजीपणा व अतिकाळजी यातील फरक ओळखून वर्तणूक ठेवल्यास आपले मानसिक स्वास्थ्य अशा परिस्थितीत निरोगी राहू शकते, जे आताच्या घडीला अत्यंत महत्त्वाचे आहे. ताणतणावावर मात करून सक्षमपणे मार्ग काढा. लक्षणे आल्यानंतर भीती वाटत असल्यास सर्वात आधी तपासणी करून घ्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानेच सर्व काही करा, स्वत:चे निर्णय स्वत: घेऊ नका.
- डॉ.दिलीप महाजन, मानसोपचारतज्ज्ञ