नवी दिल्ली - देशात वाढत्या कोरोना रुग्ण संख्येचा वेग पाहता एम्सचे (AIIMS) प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया (Director Randeep Guleria) यांनी घाबरण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे. तसेच, कोरोनाच्या या नव्या व्हेरिअंटचा प्रभाव तितकासा नाही, हा एक सौम्य आजार आहे. मात्र, कोरोनाचे नियम पाळणे अत्यंत आवश्यक आहे, असेही ते म्हणाले. याशिवाय, लसीकरण अत्यंत महत्त्वाचे आहे. मास्कचा वापर करा आणि गर्दीपासून दूर राहा. सौम्य आजार आहे, पण सावध राहणेही तेवढेच आवश्यक आहे, असेही डॉ. गुलेरिया यांनी म्हटले आहे.
यापूर्वी, गुलेरिया म्हणाले होते, की या वर्षी आपल्यात नैसर्गिक अथवा लसीमुळे मोठ्या प्रमाणावर रोगप्रतिकारशक्ती आहे. बर्याच लोकांना लस मिळाली आहे आणि यामुळे रोगप्रतिकार शक्तीच्या बाबतीत आपली स्थिती चांगली आहे. याशिवाय आपली तयारीही चांगली आहे. कोविड सेंटर-हॉस्पिटल्स, ऑक्सिजन, तसेच आयसीयू, सर्वप्रकारची तयारी पूर्ण झाली आहे.
कोरोनाचा सामना करण्यासाठी दोन शस्त्र महत्वाचे -गुलेरिया म्हणाले, आपल्याला कोरोना नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. लसीचा डोस घेण्याची वेळ आली, की तो तत्काळ घ्यायला हवा. मग तो डोस पहिला असो अथवा दुसरा. काहण या दोन शस्त्रांच्या सहाय्यानेच आपण संसर्गाची साखळी रोखू शकतो आणि आजाराची तीव्रता कमी करू शकतो.
ओमायक्रॉनसंदर्भात म्हणाले, घाबरण्याचे कारण नाही - डॉ. गुलेरिया म्हणाले, ओमायक्रोन या नव्या प्रकारात दिसून आले आहे, की तो सौम्य आजारी पाडतो, फुफ्फुसात फारसा जात नाही आणि त्याची लक्षणेही बहुदा ताप, सर्दी, मळमळ, अंगदुखी आणि खोकला हीच आहेत, यामुळे घाबरण्याचे कारण नाही. पण मी सर्वांना एक गोष्ट सांगेन की, आधी सारखी औषधी किंवा ऑक्सिजन यांसारख्या गोष्टी गोळा करून ठेवण्याची आवश्यकता नाही.