रशियाच्या कोरोना लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी भारतात सुरू होणार आहे. अशी माहिती आरोग्य मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेदरम्यान नीती आरोग्याचे सदस्य डॉ. वीके पॉल यांनी दिली. त्यांनी सांगितले की, ''रशियाच्या सरकारनं भारत सरकारशी संपर्क केला असून लस तयार करण्यासाठी मदत करण्याचे आवाहन केलं आहे. रशियानं दिलेल्या माहितीनुसार लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी भारतात होणार आहे. रशियाशी भारताचे नेहमी मित्रत्वाचे नाते राहिले आहे. या लसीची चाचणी यशस्वी झाल्यास भारतासह रशियासाठीही मोठा विजय असेल. भारत सरकारनं रशियाच्या या प्रस्तवाला मान्यता दिली आहे. रशियाच्या कोरोना लसीची चाचणी भारतीय स्वयंसेवकांवर होणार आहे. ''
आरोग्य मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना व्हायरसच्या संक्रमणातून बाहेर येत रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. मृत्यूदरही दिवसेंदिवस कमी होत आहे. आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी दिलेल्या माहितीनुसार देशात एकूण सक्रिय केसेसपैकी ६२ टक्के सक्रिय रुग्ण ५ राज्यांमध्ये आहेत. कोरोना रुग्णांचे बरं होण्याचे प्रमाण वाढत आहे. देशात आठ लाख ८३ हजार रुग्ण सक्रिय आहेत. मोठ्या संख्येनं लोक कोरोनातून मुक्त झाले आहेत.
जगातील एकूण कोरोनाबाधितांपैकी ४० टक्के रुग्ण सापडताहेत
दरम्यान कोरोनाच्या संसर्गामुळे देशातील परिस्थिती दिवसेंदिवस अधिकाधिक बिघडत चालली आहे. देशात सापडणाऱ्या कोरोनाच्या नव्या रुग्णांमध्ये दिवसागणिक झपाट्याने वाढ होत आहे. दरम्यान, रविवारी जगभरात सापडलेल्या कोरोनाच्या एकूण रुग्णांपैकी तब्बल ४० टक्के रुग्ण एकट्या भारतात सापडले आहेत. तसेच भारतानंतर सर्वाधिक कोरोनाबाधित असलेल्या अमेरिका आणि ब्राझील या दोन देशांमध्ये सापडलेल्या नव्या रुग्णांची एकत्रित आकडेवारीही भारतापेक्षा कमी आहे.दरम्यान दिलासादायक बाब म्हणजे सोमवारी देशात सापडलेल्या कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या घटून ७४ हजार ९६० झाली आहे. मात्र सोमवारी कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा वाढून ११२५ झाली. देशात एका दिवसात झालेले हे सर्वाधिक मृत्यू आहेत. देशात आतापर्यंत कोरोनामुळे ७२ हजार ७२५ जणांचा मृत्यू झाला आहे. रविवारी भारतात तब्बल ९४ हजार रुग्ण सापडले होते. तर शनिवारीसुद्धा देशात जवळपास एवढेच रुग्ण सापडले होते. याचा अर्थ सरलेल्या आठवड्याच्या अखेरीस भारतात सुमारे १ लाख ८४ हजार नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली आहे.
हे पण वाचा-
खुशखबर! भारतीय महिला शास्त्रज्ञानं तयार केली कोरोनाची लस; लवकरच चाचण्यांना सुरूवात होणार
अरे व्वा! हिवाळ्यात वापरात असलेल्या कपड्यांपासून कोरोनापासून बचाव होणार; तज्ज्ञांचा दावा