सध्या कोरोनाच्या रुग्णांची संख्या महाराष्ट्रात वाढताना दिसून येत आहे. अनेकांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पण ट्रेन आणि बसचा प्रवास करणं अजूनही पूर्णपणे थांबलेलं नाही. अशा परिस्थितीत प्रवासादरम्यान तुम्हाला कोरोना व्हायरसची लागण होऊ नये. यासाठी आम्ही काही उपाय सांगणार आहोत. ज्यांचा वापर करून तुम्ही स्वतःची काळजी घेऊ शकता. कारण अशा परिस्थितीत अनेक लोक घराबाहेर पडण्यासाठी खूप घाबरत आहेत. म्हणून ट्रेनने किंवा मेट्रोने प्रवास करत असाल तर काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे.
यांपासून लांब राहा
ट्रेनने आणि बसने प्रवास करत असताना तुम्हाला असे अनेक लोक दिसून येतील. ज्यांना सर्दी किंवा खोकल्याचा त्रास होत आहे. कोरोना व्हायरसची सुरूवातीची लक्षणं सुद्धा अशी असतात म्हणून अशी व्यक्ती तुमच्या आजूबाजूला असेल तर लांब राहण्याचा प्रयत्न करा. अनेकदा तुम्ही निरीक्षण केलं असेल की काही लोक शिंकताना तोंडावर हात न ठेवताच शिंकतात. असा प्रकार तुमच्या आजूबाजूला घडत असेल तर तुम्ही इन्फेक्शनचं शिकार होऊ शकता. त्यामुळे सावधगिरी बाळगा.
ट्रेनमध्ये हॅण्डल पकडताना
ट्रेनने प्रवास करत असताना तोल जाऊ नये म्हणून अनेकजण हॅण्डलचा वापर करतात. कोरोना इन्फेक्टेड व्यक्तीने शिंकल्यानंतर हॅण्डलला स्पर्श केलेला असू शकतो. यामार्फत तुम्हाला सुद्धा कोरोनाची लागण होऊ शकते. त्यासाठी हॅण्डलला स्पर्श करताना हातात ग्लोज् घाला किंवा सॅनिटायजरचा वापर करा.
सतत मास्कचा वापर
सध्याच्या परिस्थीतीत मास्कचा वापर न करणं तुम्हाला महागात पडू शकतं. त्यासाठी मास्कचा वापर सतत करा. मास्क वापरताना व्यवस्थित वापरा. त्यामुळे तुमचं नाक आणिु तोंड संपूर्ण झाकलेलं असावं. तुम्हाला ताप, सर्दी किंवा खोकला झाला असेल तर मास्क लावणं गरजेचं आहे.
इन्फेक्शनपासून स्वतःला रोखा
शिंका आल्यानंतर तोंडावर रुमाल धरा तसंच मास्कचा वापर करा. जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या इन्फेक्शनचा सामना करावा लागणार नाही आणि तुमचा प्रवास सुद्धा चांगला होईल. कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढती जरी असेल तरी तुम्ही रोजच्या जीवनात स्वच्छतेबाबत काही गोष्टींची काळजी घेऊन तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला कोरोना व्हायरसच्या इन्फेक्शनपासून दूर ठेवू शकता.