भारताचा शेजारी देश चीनमध्ये कोरोनाने हाहाकार माजविण्यास सुरुवात केली आहे. हॉस्पिटल रुग्णांनी भरून गेली आहेत, फरशीवर रुग्णांना झोपवून उपचार केले जात आहेत. डॉक्टर कामाच्या ताणामुळे चक्कर येऊन पडत आहेत. दफनभूमीवर रांगा लागल्या आहेत. अशी परिस्थिती असताना भारतातही आज कोरोनाच्या वाढत्या प्रकोपावर केंद्रीय आणि राज्य स्तरावर बैठका घेण्यात आल्या आहेत. यामध्ये कोरानाची नियमावलीचे पालन करण्या सांगण्यात आले आहे.
अशातच अवघ्या जगाला कोरोना लसीचा पुरवठा करणारे सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदार पुनावाला यांनी चीनमधील कोरोना प्रकोप चिंताजनक असल्याचे म्हटले आहे. परंतू याचबरोबर भारतीयांना कोरोनापासून घाबरण्याची गरज नाहीय, असा विश्वास दिला आहे. भारतात कोरोना लसीकरणाचे चांगल्या प्रकारे कव्हरेज झालेले आहे. तसेच ट्रॅक रेकॉर्डही चांगले आहे. ते पाहता कोरोना महामारीच्या प्रसारावर घाबरण्याची गरज नाहीय, असे पुनावाला म्हणाले.
मात्र याचबरोबर त्यांनी भारत सरकार आणि आरोग्य मंत्रालयाने ठरविलेल्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करावे, असे आवाहनही केले आहे.
चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा हाहाकार माजला आहे. दरम्यान, चीनमध्ये कोरोना वाढत्या रुग्णसंख्येसाठी जबाबदार असलेल्या ओमायक्रॉनच्या सब व्हेरिएंट BF.7 ची तीन प्रकरणे भारतातही समोर आली आहेत. यासंदर्भात अधिकृत सूत्रांनी बुधवारी माहिती दिली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, भारतात गुजरात बायोटेक्नॉलॉजी रिसर्च सेंटरने BF.7 चे पहिले प्रकरण शोधले होते. गुजरातमध्ये आतापर्यंत दोन प्रकरणे नोंदवली गेली आहेत, तर ओडिशातून एक प्रकरण नोंदवले गेले आहे, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
बुधवारी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कोरोना आढावा बैठकीत तज्ज्ञांनी सांगितले की, कोरोना प्रकरणांमध्ये आतापर्यंत एकूण वाढ झालेली नसली तरी सध्याच्या आणि नवीन व्हेरिएंटचा मागोवा घेण्यासाठी सतत देखरेख ठेवण्याची गरज आहे. दरम्यान, येथील अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चीनमधील विविध शहरे सध्या ओमायक्रॉनच्या विळख्यात आहेत. हा कोरोनाचा अत्यंत संसर्गजन्य व्हेरिएंट आहे.