भारतासह संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरसचे अनेक व्हेरिअंट समोर आले आहेत. या व्हेरिअंटमुळे वाढणाऱ्या रुग्णसंख्येने पुन्हा एकदा देशासह जगाचेही टेन्शन वाढवायला सुरुवात केली आहे. भारतात काही राज्यांनी पुन्हा एकदा मास्क बंधनकारक केले असून आरोग्य विभाग कोरोना प्रकरणांवर बारकाईने लक्ष ठेऊन आहे. याशिवाय, जागतिक आरोग्य संघटनाही (WHO) वेळो-वेळी कोरोना स्थिती, नवे व्हेरिअंट आणि त्यांची संक्रमकता यासंदर्भात अपडेट देत आहे.
WHO ने नुकताच मोठा इशारा दिला आहे. कोरोनाचा पुढचा व्हेरिअंट टेन्शन वाढवू शकतो, असे डब्ल्यूएचओने म्हटले आहे. WHO एपिडेमियोलॉजिस्ट Dr. Maria Van Kerkhove म्हणाल्या, सध्या जगभरात ओमायक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण आहेत. याच बरोबर आम्ही याचे सबव्हेरिअंट BA.4, BA.5, BA.2.12.1 यांवरही लक्ष ठेवून आहोत.
पुढचा व्हेरिअंट कोणता असेल? -जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे, की कोरोना व्हायरसचा पुढचा व्हेरिअंट कोणता असेल, हे सांगणे अवघड आहे. आमच्यासाठी हा एक चिंतेचा विषय आहे. आता आपण वेगवेगळ्या परिस्थितीनुसार प्लॅन तयार करायला हवा. आपल्याकडे जीव वाचवू शकेल असे तत्रज्ञान आहे. मात्र, त्याचा नियोजनबद्ध पद्धतीने वापर करणे आवश्यक आहे. मात्र, सध्या तरी लस हेच या आजारावरील रामबान औषध आहे.
धोका आणखी टळलेला नाही - डब्ल्यूएचओचे प्रमुख टेड्रोस अॅधानोम घेब्रेयसस (Tedros Adhanom Ghebreyesus) म्हणाले, टेस्टिंग कमी झाल्याने कोरोनाच्या धोक्याकडे लोकांचे दुर्लक्ष झाले आहे. कोरोना मृतांच्या संख्येत झालेली घट, ही नक्कीच दिलासादायक गोष्ट आहे. याचे स्वागत करायला हवे. मात्र, ही घट कमी टेस्टिंगमुळेही झालेली असू शकते. कमी होत चाललेल्या आकडेवारीने आपल्याला आंधळे बनवले आहे. खरे तर या घातक व्हायरसचा धोका अद्यापही कायम आहे आणि तो अजूनही लोकांचे बळी घेत आहे.