- प्रज्ञा केळकर-सिंग
पुणे : संपूर्ण जग वेठीस धरणारे कोरोना विषाणू आहेत तरी किती? संशोधन सांगते की, संसर्ग झालेल्या एका व्यक्तीत साधारणत: दहा हजार कोटी विषाणू असतात. वजनात मोजायचे तर फक्त शंभर मायक्रोग्रॅम म्हणजेच एका मिलिग्रॅमपेक्षाही दहा पटीने कमी. म्हणजेच या घडीला जगभरातील सगळ्या कोरोना बाधितांमधील सगळ्या विषाणूंचे वजन एकत्र केले तर ते जास्तीत जास्त भरेल अवघे १० किलो.कोरोना विषाणूपेक्षा फुप्फुसातील पेशी हजारो पटींनी मोठ्या असतात. फुप्फुसातील एका पेशीत किमान पाच ते दहा हजार कोरोना विषाणू सहज राहू शकतात.
एवढ्या छोट्या कोरोना विषाणूचे आकारमान शोधण्यात इस्रायल आणि अमेरिकेतील शास्त्रज्ञांना यश आले आहे. एका कोरोना विषाणूचे वजन शंभर ते दीडशे नॅनोमीटर असल्याचे त्यांचे संशोधन आहे. एका कोरोना विषाणूचा आकार आहे एका मीटरच्या नऊ कोटीव्या भागाइतका अतिसूक्ष्म. इस्रायलमधील वाईझमॅन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स आणि अमेरिकेतील कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधील शास्त्रज्ञांनी कोरोनाच्या आकाराचे संशोधन केले आहे.
अमेरिकेच्या नॅशनल ॲकेडमी ऑफ सायन्सच्या जर्नलमध्ये ते प्रसिद्ध झाले आहे. इंग्लंडमधील ऑक्सफर्ड विद्यापीठातील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. नानासाहेब थोरात यांनी ‘लोकमत’ला सांगितले, की साहजिकच एवढा अतिसूक्ष्म विषाणू उघड्या डोळ्यांनी दिसू शकत नाही.
प्रतिपिंडे तयार होण्याचे प्रमाण रक्तामध्ये सर्वाधिक असते तर फुप्फुसामध्ये फार कमी असते. कोरोनाचा संसर्ग फुप्फुसांमध्ये पसरतो तेव्हा तो रोखणे अवघड होते. दहा हजारांपासून दहा कोटी पेशींना संसर्ग करून विषाणू स्वतःची संख्या शंभर कोटींपेक्षा अधिक करतो, तेव्हासुद्धा त्याचे वजन फक्त काही मायक्रोग्रॅम असते. - डॉ. नानासाहेब थोरात, वरिष्ठ शास्त्रज्ञ, ऑक्सफर्ड विद्यापीठ