देशात कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता देशात कोरोना लसीच्या मुद्द्यावरून राजकारण पेटून उठलं आहे. यादरम्यान केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांना शनिवारी एका खासगी वाहिनीवर लसीवरून होणारं राजकारण आणि आतापर्यंत फक्त २ लसींच्या उपलब्धतेवरून प्रश्न विचारण्यात आले. यावेळी त्यांनी लसीकरणासंबंधीत प्रश्नांची उत्तरं देत लोकांच्या मनातील संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला.
केंद्रीय आरोग्यमंत्री म्हणाले की,'' एका वर्षात आम्ही दोन लसी तयार केल्या आहेत. त्याशिवाय सध्या क्लिनिकल चाचण्यांमध्ये 6 लसी आहेत तर 14 प्री-क्लिनिकल ट्रायल मोडमध्ये आहेत. आमच्याकडे असलेल्या दोन लसींचे ९ कोटी डोस देण्यात आले आहेत. '' या सर्वाचे श्रेय थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले.
फायझरनं, मॉडर्नानं कधी आवेदन केलेलं नाही
आतापर्यंत फायझर किंवा मॉडर्नाची लस भारतात आणली गेली नाही या प्रश्नावर हर्षवर्धन म्हणाले की, ''फायझरने येथे सुरुवातीला अर्ज केला होता. जेव्हा आपल्याला येथे चाचणी करावी लागेल असे सांगण्यात आले तेव्हा त्यांनी आपला अर्ज मागे घेतला. दुसरीकडे, मॉडर्नाने कधीही अर्ज केलेला नाही.''
१० दिवसांच्या आत स्पुटनिक व्ही लसीच्या वापराला मंजूरी मिळणार
रशियन लस स्पुतनिक लसीच्या वापरासंदर्भात एका प्रश्नावर हर्ष वर्धन यांनी स्पष्टीकरण दिले की, ''आमच्याकडे या लसीसाठी अर्ज आहे आणि आपत्कालीन वापरासाठी १० दिवसांच्या आत या लसीच्या वापराला परवानगी देण्यात येईल. ''
महाराष्ट्राला सर्वाधिक लसी
आजपर्यंत जर कोणत्या राज्याला आम्ही सर्वाधिक लसी दिल्या असतील तर ते राज्य महाराष्ट्र आहे. महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थान ही ३ अशी राज्ये आहेत ज्यांना १ कोटी पेक्षा अधिक लसींच्या डोसचा पुरवठा करण्यात आला. कोरोना लसीकरणाचा राज्यांच्या लोकसंख्येशी काही संबंध नाही. ते अनेक गोष्टींवर अवलंबून असतं. जर तुम्ही लोकसंख्येच्या दृष्टीनं पाहिलं तर उत्तर प्रदेशला सर्वाधिक लसी मिळायला हव्या होत्या. परंतु तसं झालं नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
सरासरी लसीकरण अमेरिकेपेक्षाही अधिक
"लसीकरण मोहीम ही एक डायनॅमिक प्रोसेस आहे. ती नंबर्सच्या आधारावर पाहता येणार नाही. आपल्याकडे देशात दिवसाला होणारं लसीकरण हे अमेरिकेपेक्षाही अधिक आहे. आपण सर्वात जलद गतीनं आणि सर्वात कमी वेळा ९ कोटी लोकांचं लसीकरण पूर्ण केलं आहे," अशी माहितीही डॉ. हर्षवर्धन यांनी दिली.
लसीकरण एक सायंटिफिक प्रोसेस असून जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ते पहिले ज्येष्ठ नागरिक किंवा काही आजार असलेल्या लोकांना देणं अपेक्षित आहेत. त्या आधारावरच आम्ही सुरुवातीला आरोग्य कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाला सुरूवात केली आणि त्यानंतर त्याची व्याप्ती वाढवल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.