कोरोनाचा सामना करण्यासाठी भारताला लवकरच आणखी एक लस मिळू शकते. अमेरिकन फार्मा कंपनी जॉन्सन अँड जॉन्सनने भारत सरकारकडे आपल्या लसीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी मागितली आहे. विशेष म्हणजे, ही सिंगल डोस लस आहे. म्हणजेच, या लसीचा एकच डोस कोरोनाच्या विरोधात पुरेसा आहे. भारतात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सध्या ज्या लसींचा वापर होत आहे, त्या सर्व लसींचा डबल डोस घ्यावा लागतो. (CoronaVaccine johnson brought single dose vaccine sought permission for use against corona virus)
परवानगी मिळाली तर असेल चौथी लस -सध्या भारतात कोरोनाला आळा घालण्यासाठी भारत बायोटेकची कोव्हॅक्सीन, कोविशिल्ड आणि रशियाची स्पुतनिक-व्ही या लसींचा वापर केला जात आहे. या तीन्ही लसींच्या माध्यमाने देशात मोठ्या प्रमाणावर लसीकरण मोहीमही राबवली जात आहे. यातच, भारत सरकारने जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीलाही परवानगी दिली, तर ती चौथी लस असेल. महत्वाचे म्हणजे, या लसीचा एकच डोस कोरोनाला रोखण्यासाठी पुरेसा आहे.
CoronaVirus : कोव्हॅक्सीन घेतलेल्यांची विचित्र कोंडी, टेन्शन वाढलं...! ठोठावला न्यायालयाचा दरवाजा
जवळपास 50 कोटी लोकांना टोचण्यात आली लस -कोव्हॅक्सीन, कोविशिल्ड आणि स्पुतनिक-व्हीच्या सहाय्याने आतापर्यंत भारतात सुमारे 50 कोटी लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार 49.5 कोटी लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे. गुरुवारी सायंकाळी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गुरुवारी देशात 50.29 लोकांना लस टोचण्यात आली आहे. याच बरोबर, 18 ते 44 वयोगटातील 16.92 कोटी लोकांना आतापर्यंत पहिला डोस देण्यात आला आहे. तर 1.07 कोटी लोकांना दोन्ही डोस देण्यात आले आहेत.
देशात 24 तासांत 44 हजार 643 कोरोनाबाधितांची नोंद -देशभरात गेल्या 24 तासांत 44 हजार 643 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 464 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात सध्या 4 लाख 14 हजार 159 कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार सुरू आहे. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत 41 हजार 096 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच देशभरात आतापर्यंत 3 कोटी 10 लाख 15 हजार 844 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत 6 हजार 695 नवे कोरोनाबाधित - महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत 6 हजार 695 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 7 हजार 120 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 61 लाख 17 हजार 560 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.66 टक्के झाले आहे. राज्यात आज 120 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली.