जॉनसन एंड जॉनसनच्या (johnson & johnson) सिंगल डोसच्या कोरोना लसीला (CoronaVaccine) अमेरिकेत मंजूरी मिळाली आहे. फायजर आणि मॉर्डनानंतर आता अमेरिकेची ही तिसरी लस आहे. एफडीएनं आपात्कालीन वापरासाठी या लसीला परवानगी दिली आहे. ही लस कोरोनाचं संक्रमण रोखण्यासाठी प्रभावी ठरेल याची पुष्टी एफडीएनं केली आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जवळपास ६६ टक्के प्रभावी क्षमता या लसीची असून ही लस ८५ टक्के प्रभावी असल्याचे दिसून येत आहे.
एफडीच्या म्हणण्यानुसार जॉन्सन आणि जॉन्सनची लस वापरण्यासाठी सुरक्षित आहे. ही लस देताना दोनऐवजी फक्त एक डोस आवश्यक असेल. कंपनीने अमेरिकन कॉंग्रेसला सांगितले की ते मार्च अखेरपर्यंत दोन कोटी आणि जूनपर्यंत १० कोटी डोस पुरवले जातील. वर्षाच्या अखेरीस एक अब्ज डोस उत्पादन करण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे.
४४ हजार वयस्कर लोकांवर करण्यात आली होती लसीची चाचणी
जॉन्सन अँड जॉन्सन यांनी अमेरिका, लॅटिन आणि दक्षिण आफ्रिका येथे दोन महिन्यांच्या वैद्यकीय सेवेसह सुमारे ४४००० प्रौढांकरिता एकल डोस लसची चाचणी घेतली. यूएस एफडीएने या लसीबद्दल सांगितले की, "या विश्लेषणामध्ये सुरक्षिततेचे सर्व मापदंड पाळले गेले आहेत आणि आपात्कालीन वापरास बाधा आणत असलेल्या सुरक्षिततेशी संबंधित कोणतीही समस्या आढळली नाही."
अमेरिकेत कोविड -१९ मधील मृतांची संख्या जवळपास साडेपाच लाखांवर पोहोचली आहे. तथापि, देशात संसर्ग दरात हळू हळू घट होत आहे. आतापर्यंत अमेरिकेतील सुमारे ४.४५ कोटी नागरिकांना फायझर आणि मॉडर्ना कंपनीने तयार केलेल्या लसीचा किमान एक डोस प्राप्त झाला आहे. तसंच दोन कोटी लोकांना दुसरा डोस मिळाला आहे.
दिलासादायक! आता कोरोनापासून बचाव करणं आणखी सोपं होणार; टॅबलेटमध्ये मिळू शकते लस
दरम्यान कोरोना व्हायरसची लस टॅबलेटच्या स्वरूपात मिळू शकणार आहे. ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीतील वैज्ञानिकांनी या संशोधनावर काम सुरू केले आहे. डेली मेलनं दिलेल्या माहितीनुसार ऑक्सफोर्ड आणि एक्सट्राजेनका लसीच्या मुख्य तज्ज्ञ सारा गिल्बर्ट यांनी आपल्या टीमसह इंजेक्शन फ्री लस देण्याचे काम सुरू केले आहे.
वैज्ञानिकांच्या टीमकडून कोरोना व्हायरसच्या लसीचा शोध सुरू आहे. जी फ्लूच्या आजारासाठी उपयोगी असलेल्या नेजल स्प्रे प्रमाणे किंवा पोलिओच्या लसीकरणात उपयोगी ठरत असलेल्या टॅबलेटप्रमाणे असेल. ही फक्त इंजेक्शनची धास्ती असलेल्यांसाठी आनंदाची गोष्ट नाही तर संपूर्ण जगभरात लसीकरण अभियानाला यामुळे गती मिळणार आहे. याशिवाय इतर लसींप्रमाणे ठराविक तापमानात स्टोअरही करावं लागणार नाही.
प्राध्यापक गिल्बर्ट यांनी हाऊस ऑफ कॉमन्स एंण्ड टेक्नोलॉजी कमिटीशी बोलताना सांगितले की, ''टॅबेलट किंवा नेझल स्प्रे फुफ्फुसं गळाआणि नाकाच्या इम्यून सेलवर योग्यपद्धतीनं काम करतील. अनेक लसी अशा आहेत ज्या नेझल स्प्रे च्या स्वरूपात घेतल्या जातात. कोरोना व्हायरसच्या टॅबलेटच्या लसीच्या निर्मीतीसाठी प्रयत्न केले जात आहेत. नेझल स्प्रे आणि टॅबलेट लस तयार करण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो.''