लसीकरण झाले तरी कोरोना होऊन रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण अगदीच नगण्य असल्याचे एका पाहणीत आढळून आले आहे. दिल्लीतील इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटलने ही पाहणी केली..
किती लोकांची पाहणी करण्यात आली
अभ्यासासाठी इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटलतर्फे ३,२३५ आरोग्य कर्मचाऱ्यांची पाहणी करण्यात आली. लसीकरणानंतरच्या १०० दिवसांत कोरोनाची लक्षणे आढळून आलेल्या कर्मचाऱ्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आले.अभ्यास कालावधीत ८५ आरोग्य कर्मचारी कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले.
किती लोकांना रुग्णालयात दाखल व्हावे लागले
हॉस्पिटलतर्फे करण्यात आलेल्या पाहणीत कोरोनाप्रतिबंधक लस घेतलेल्यांपैकी केवळ ०.०६ टक्के लोकांनाच रुग्णालयात दाखल करावे लागल्याचे आढळून आले. कोरोनाची लागण झालेल्या ८५ कर्मचाऱ्यांपैकी ६५ जणांना लसीच्या दोन्ही मात्रा मिळाल्या होत्या तर उर्वरितांना एकच मात्रा मिळाली होती. त्यातही बाधितांमध्ये महिलांचे प्रमाण लक्षणीय होते.
रुग्णालयात दाखल झालेल्यांमध्येही फार गुंतागुंत निर्माण झाली नाही. त्यांचा कोरोना सहज बरा होणारा असल्याचेही स्पष्ट झाले.लसीकरण मोहीम संपूर्ण झाली तरी कोरोना होण्याचे प्रमाण शून्यावर येईल, असे नाही. लसीकरणानंतरही कोरोना झाला तरी त्यात रुग्णाची प्रकृती गंभीर वा अत्यवस्थ होण्याची शक्यता अजिबात नाही. तसेच मृत्यूचे प्रमाणही कमी होण्याची हमी आहे. कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लसी घेतलेल्यांची पाहणी या अभ्यासात करण्यात आली होती.९७.३८ टक्के लोकांचे लसीकरणामुळे कोरोनापासून रक्षण झाल्याचे अभ्यासात स्पष्ट झाले.या पाहणीतून असे निश्चित झाले की कोरोनाप्रतिबंधक लसी १०० टक्के प्रतिकारशक्ती निर्माण करत नाही.