नवी दिल्ली : देशात दररोज तीन लाखांहून अधिक कोरोनाचे नवीन रुग्ण आढळून येत आहेत. दरम्यान, पुढील महिन्याच्या 15 तारखेपासून रोजची नवीन कोरोना प्रकरणे कमी होण्यास सुरुवात होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. देशात कोरोना व्हायरसच्या ओमायक्रॉन या नवीन व्हेरिएंटच्या वेगामुळे कोरोनावर उपचार घेतलेल्या रुग्णांची संख्या जवळरपास 22.50 लाख झाली आहे.
दरम्यान, सरकारी सूत्रांच्या म्हणण्यानुसार, 15 फेब्रुवारीपासून दररोज समोर येणाऱ्या नवीन कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसेल. काही राज्ये आणि महानगरांमध्ये प्रकरणे कमी होऊ लागली आहेत आणि आता नवीन प्रकरणांची संख्या जवळपास स्थिर झाली आहे. तसेच, सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना महामारीच्या विरोधात देशव्यापी लसीकरण मोहिमेचा परिणाम कोरोनाच्या तिसऱ्या लाटेवर स्पष्टपणे दिसून येत आहे.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा परिणाम आधीच्या दोन लाटांपेक्षा खूपच कमी असण्यामागे लसीकरणाची भूमिका आहे. देशातील 74 टक्के वयस्कर लोकांना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत. आरोग्य मंत्रालय नवीन लाटेचा सामना करण्यासाठी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना मदत करत आहे, असे सरकारी सुत्रांनी सांगितले.
दररोज तीन लाखांहून अधिक रुग्णदेशात एका दिवसात कोरोनाचे 3,06,064 नवीन रुग्ण आढळल्यानंतर, देशातील कोरोना संक्रमितांची संख्या 3,95,43,328 वर पोहोचली आहे. तर, उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 22,49,335 वर पोहोचली आहे, जी 241 दिवसांतील सर्वाधिक आहे. सोमवारी सकाळी 8 वाजता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, संसर्गामुळे आणखी 439 लोकांचा मृत्यू झाला. तर देशातील मृतांची संख्या 4,89,848 वर पोहोचली आहे.
एका दिवसात उपचार घेतलेल्या रुग्णांची संख्या 62 हजारांहून अधिकसध्या देशात 22,49,335 लोक कोरोना संसर्गावर उपचार घेत आहेत, जे एकूण प्रकरणांपैकी 5.69 टक्के आहे. गेल्या 24 तासांत कोरोनावर उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या संख्येत 62,130 ची वाढ झाली आहे. देशातील रुग्णांचा बरे होण्याचा दर 93.07 टक्क्यांवर आला आहे. 19 डिसेंबर 2020 रोजी या प्रकरणांनी देशात एक कोटींचा आकडा पार केला होता. गेल्या वर्षी 4 मे रोजी कोरोना संक्रमितांची संख्या 2 कोटी पार झाली होती आणि 23 जून 2021 रोजी 3 कोटी पार झाली होती.