नवी दिल्ली – सध्या संपूर्ण जग कोरोना महामारीशी लढा देत आहे. भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर केला आहे. संशोधकांनी कोरोनावर लस शोधून काढली पण अद्याप कोणतंही औषधं कोरोनाच्या उपचारासाठी मिळालं नाही. दुसऱ्या आजारात वापरण्यात येत असलेली औषधं कोरोनासाठी वापरण्यात येत आहे. यातच गोवा सरकारनं कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी आयवरमेक्टिन या औषधाला परवानगी दिली. परंतु आता जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्य डॉक्टर सौम्या स्वामीनाथन यांनी या औषधाच्या वापराबाबत धोक्याचा इशारा दिला आहे.
जागतिक आरोग्य संघटनेनुसार आयवरमेक्टिन(Ivermectione) हे औषध कोरोना रुग्णांवर उपचारासाठी सुरक्षित नाही. सौम्या स्वामीनाथन यांनी ट्विट करून सांगितलंय की, WHO आयवरमेक्टिन औषधाच्या वापराच्या विरोधात आहे. कोणत्याही औषधाचं सुरक्षा आणि किती प्रभावी आहे हे ध्यानात ठेवायला हवं. या औषधाचा वापर फक्त क्लिनिकल ट्रायलमध्ये व्हायला हवा. त्यांनी ट्विटमध्ये मर्क नावाच्या कंपनीचा हवाला देत या औषधाबद्दल माहिती दिली आहे.
काय आहे इशारा ?
या वर्षी फेब्रुवारी महिन्यात मर्क यांनी कोरोना रुग्णांवरील आयवरमेक्टिन औषधाचा वापरावरून रिपोर्ट प्रकाशित केला होता. त्यानुसार क्लिनिकल ट्रायलमध्ये या औषधाचे कोणतेही निष्कर्ष समोर आले नाहीत की हे औषध रुग्णांवर प्रभावशाली काम करते. त्याचसोबत कंपनीकडून वैज्ञानिकांनी म्हटलं की, हे औषध क्लिनिकल ट्रायलमध्ये किती सुरक्षित आहे याचा डेटाही उपलब्ध नाही. अमेरिकेत हे औषध STROMECTOL नावानं मिळतं. या औषधांचे अनेक साईड इफेक्ट असल्याचा दावा केला जातो. मागील २ महिन्यापासून WHO ने दुसऱ्यांदा आयवरमेक्टिन औषधाच्या वापरावरून धोक्याचा इशारा दिला आहे.
गोवा सरकार काय म्हणालं?
गोव्याचे आरोग्य मंत्री म्हणाले होते की, आयवरमेक्टिन १२ एमजी औषधाचा वापर ५ दिवसापर्यंत करायला हवा. यूके, इटली, स्पेन आणि जपानच्या अनके तज्त्रांनी या औषधाचा वापर कोरोनामुळे होणारे मृत्यूदर कमी करण्यात होत असल्याचं सांगितलंय. फक्त मृत्यूदर नव्हे तर रिकव्हरी आणि वायरल लोड कमी करण्यासाठीही हे औषध प्रभावीशाली ठरतंय. हे औषध कोरोनाचं संक्रमण रोखत नसलं तरी रुग्ण गंभीर होण्याचं प्रमाण कमी करत असल्याचा दावा करण्यात आला आहे.