गुवाहाटी : कोरोनाच्या साथीमुळे उद्योगधंदे व अर्थव्यवस्थेलाही तडाखा बसला असून त्याचा परिणाम लोकांचे मानसिक आरोग्य, सामाजिक वातावरण यावरही झाला आहे. लोक नोकऱ्या गेल्यामुळे प्रचंड निराश असून त्यांची आर्थिक ओढाताण सुरू आहे. कोरोनाच्या साथीमुळे वैद्यकीय सेवेवर आलेल्या ताणामुळे आरोग्यविषयक विविध चाचण्यांचे अहवाल मिळण्यासही खूप विलंब लागत आहे.
जीएमसीएचमधील ‘क्लिनिकल सायकॉलॉजी’ या विषयाच्या सहयोगी प्राध्यापक डॉ. मिथिली हजारिका यांनी सांगितले, कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर मानसिक व सामाजिक स्थितीचा अभ्यास करण्यासाठी गुवाहाटी मेडिकल कॉलेज व रुग्णालयातील डॉक्टर, मानसोपचार तज्ज्ञांच्या पथकाने राष्ट्रीय आरोग्य योजनेच्या अंतर्गत आसाममध्ये एक पाहणी केली. त्यातील हे निष्कर्ष आहेत. या पाहणीसाठी डॉक्टर व मानसोपचार तज्ज्ञांनी १७ जूनपासून कोरोना रुग्णांना ३,२३८ दूरध्वनी केले. त्यातील १५३९ लोकांशी त्यांनी संवाद साधला. त्यापैकी २२ टक्के लोक नोकरी गेल्यामुळे तसेच ११ टक्के लोक आर्थिक विवंचनेमुळे निराश दिसले.हजारिका म्हणाल्या, नऊ टक्के लोकांना करिअर धोक्यात येणार याची काळजी होती तर कुटुंबीयांच्या गरजा नीट भागत नसल्याबद्दल १३ टक्के लोकांना चिंता होती. रुग्णांपैकी ९७ टक्के लोकांना काळजीने नीट झोप लागत नसे. काही रुग्णांच्या मनात आत्महत्येचेही विचार येत.