सध्या कोरोना व्हायरसने भारतातही एन्ट्री घेतली असून लोकांमध्ये भितीचं वातावरण आहे. अशात तज्ज्ञांकडून लोकांना स्वच्छता ठेवण्याचा आणि विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला जात आहे. अशात तुम्हाला जर नखं खाण्याची सवय असेल तर तुम्हाला कोरोना व्हायरसचं इन्फेक्शन होण्याचा धोका अधिक राहतो. अशा लोकांना धोका का राहतो याबाबत अॅलर्जी आणि संसर्गजन्य आजाराच्या स्पेशालिस्टकडून माहिती देण्यात आली आहे.
न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीतील Langone Medical Center मधील अॅलर्जी आणि इन्फेक्शन डिजीज स्पेशालिस्ट पूर्वी पारीख यांनी सांगितले की, सगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया, व्हायरस, घाण, धुळ-माती नखांमध्ये जमा होत असते. आणि जेव्हा तुम्ही नखं खाता तेव्हा ते सहजपणे तुमच्या तोंडात जातात. पण जर तुम्ही हात सॅनिटायजरने व्यवस्थित स्वच्छ करत असाल तर हा धोका टाळता येऊ शकतो.
डेली मेलसोबत बोलताना पारीख म्हणाल्या की, 'जेव्हा जेव्हा तुम्ही तोंडाला हात लावता तेव्हा तेव्हा नखांमधील बॅक्टेरिया, व्हायरस तुमच्या तोंडावाटे शरीरात जाण्याचा धोका असतो. यानेच तुम्हाला लगेच इन्फेक्शन होऊ शकतं. तुम्हाला हा धोका टाळायचा असेल तर नखं खाण्यावर कंट्रोल मिळवणं गरजेचं आहे'.
मात्र, चुकीच्या सवयी सोडवणं वाटतं तेवढं सोपं नसतं. अनेकांना माहीत असतं की, या सवयी हानिकारक आहेत तरी सुद्धा ते त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करत नाहीत. त्यांना या सवयींची इतकी सवय झालेली असते की, ते नखं खात असल्याचं त्यांच्या लक्षातही येत नाही.
नखं खाण्याची सवय कशी मोडाल?
- तज्ज्ञांनी कोरोना व्हायरसचा धोका टाळण्यासाठी आणि नखं खाण्याची सवय दूर करण्यासाठी काही सोपे उपायही सांगितले आहेत. त्यात ग्लव्ह्स, नखांची स्वच्छता आणि च्युइंगम खाणे यांचा मुख्यत्वे समावेश आहे.
- नखं खाण्याचं मन होत असेल तर च्युइंगम खाऊन तुमची क्रेविंग दूर केली जाऊ शकते. याने तुमचं मन नखांवरून दूर होईल.
- तसेच तोंडात बोटं घालणं किंवा नखं खाणं टाळायचं असेल तर दात आणि हात दोन्ही बिझी ठेवा. याने तुम्ही तोंडाजवळ हात नेणार नाही आणि तुम्हाला इन्फेक्शन होणार नाही. दात बिझी ठेवण्यासाठी च्युइंगम सर्वात चांगला पर्याय आहे.
- तसेच हात बिझी राहले तर डोळ्यांना लावता येणार नाही. म्हणजे डोळ्यांनाही इन्फेक्शन होणार नाही.