जगभरात कोरोना व्हायरसच्या थैमानाने लोक हैराण झाले आहेत. आतापर्यंत तरी भारतात याने कुणाचाही मृत्यू झाला नाही. पण दिल्लीमध्ये एक व्यक्ती कोविड-१९ पॉझिटिव्ह आढळली आहे. त्यामुळे दिल्लीत भीतीचं वातावरण आहे. अशात मेडिकल स्टोरमध्ये मास्क आणि सॅनिटायजरचा तुटवडा पडला आहे. कारण लोक मोठ्या प्रमाणात मास्कची खरेदी करत आहेत.
एकीकडे फ्रान्सच्या मसिला शहरात २ हजार मास्क चोरीला गेले. तर अमेरिकेतील सर्जन जनरलने २९ फेब्रुवारीला एक ट्विट करून सांगितले होते की, मास्क खरेदी करणं बंद करा. अशात कुणाचं ऐकायचं? असा प्रश्न लोकांना पडणं साहजिक आहे. त्यात सर्वात मोठा प्रश्न हा आहे की, मास्कची गरज आहे की नाही? असेल तर कुणाला आहे आणि कोणत्या मास्कची गरज आहे? चला याबाबत जाणून घेऊ....
मास्क कुणी वापरावा?
जर तुम्हाला काहीच झालेले नसेल, तुम्ही निरोगी असाल तर तुम्हाला मास्क वापरण्याची गरज नाही. पण जर तुम्ही कोरोना ग्रस्त व्यक्तीची काळजी घेत असाल तर तुम्हाला मास्कची गरज आहे. तसेच ज्या लोकांना ताप, कफ, सर्दी किंवा खोकला झाला असेल तर त्यांनीही मास्क वापरावा. तसेच त्यांनी वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
WHO ने सांगितले कसा वापरावा मास्क
मास्कबाबत उडालेल्या गोंधळादरम्यान WHO ने मास्क कसा वापरावा याबाबत माहिती जारी केली आहे. WHO नुसार, मास्कला समोरून हात लावू नये. जर हात लावलाच तर हात लगेच चांगले धुवावे. नाक, तोंड, दाढी पूर्णपणे झाकली जाईल अशाप्रकारे मास्क घालावा. मास्क काढताना देखील मास्कच्या इलास्टिक किंवा रिबीन पकडून मास्क काढावा. मास्कला समोरून हात लावू नये. या व्हिडीओत तुम्हाला सगळं कळेल.
फोर्ब्सच्या रिपोर्टमध्येही मास्क गरजेचा नाही
जर तुम्हाला इन्फेक्शन नसेल तर मास्क घालणं गरजेचं नाही, असं FORBES च्या रिपोर्टमध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे. युनिव्हर्सिटी ऑफ आयोवा कॉलेज ऑफ मेडिसिनमध्ये मेडिसिन आणि महामारी विज्ञानान्या प्रोफेसर एली प्रेन्सेविक यांच्यानुसार, तुम्ही मास्क वापरण्याची गरज नाही. त्यांनी सांगितले की, तुम्ही जर निरोगी असाल तर तुम्ही एन९५ मास्क घालण्याची काहीच गरज नाही. कारण याचा आतापर्यंत कोणताही पुरावा समोर आला नाही की, निरोगी लोक मास्क घालून कोरोना व्हायरसपासून बचाव करू शकतात. उलट लोक मास्क चुकीच्या पद्धतीने घालतात आणि सतत मास्कला हात लावतात. याने त्यांना धोका वाढू शकतो. त्यामुळे तुम्ही आजारी असाल तरच मास्क वापरा.
कोरोनापासून बचाव कसा करावा?
कोरोनापासून बचाव करण्यासाठी हायजीन म्हणजे स्वच्छतेची पूर्ण काळजी घ्यावी.
तुमचे हात थोड्या थोड्या वेळाने सॅनिटायजरने सॅनिटाइज करा किंवा साबणाने चांगले स्वच्छ करा.
ज्यांना सर्दी, खोकला, ताप असेल त्यांच्याजवळ जाऊ नका. तुमच्यातही अशीच लक्षणे दिसत असतील तर वेळीच डॉक्टरांशी संपर्क करा.
भरपूर प्रमाणात पाणी प्यावे आणि दही खात रहावे.
अस्वच्छ हात डोळे, नाक तोंडाला लावू नका.
जास्त गर्दी असलेल्या ठिकाणी जाऊ नका.
गळाभेट घेऊ नका आणि हातही मिळवणे टाळा.