कोरोना व्हायरसच्या माहामारीने संपूर्ण जगभरात हाहाकार निर्माण केला आहे. जगभरात कोरोनामुळे आतापर्यंत एक कोटी ८१ लाख लोक संक्रमित झाले आहेत. तर ६ लाख ९० हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतात कोरोना संक्रमणाचं प्रमाण वाढत आहे. अनेक देशांमध्ये दिवसांला ५० हजारांपर्यंत रुग्ण सापडत आहेत. देशात आतापर्यंत १८ लाख लोक संक्रमणाचे शिकार झाले असून मृतांचा आकडा ३९ हजारांपर्यंत पोहोचला आहे. आता कोरोनाची दुसरी लाट भारतात येण्याची शक्यता कितपत आहे. याबाबत तज्ज्ञांनी आपलं मत व्यक्त केलं आहे.
माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार आयसीएमआरचे प्रमुख डॉ. बलराम भार्गव यांनी सांगितले की, भारतात कोरोना संक्रमणाची दुसरी लाट येऊ शकते याबाबत सांगणं कठीण आहे. पण भारतातील विविध ठिकाणी भौगोलिक स्थितीतील बदलत्या वातावरणात कोरोनाच्या लहान लाटा निर्माण होऊ शकतात. देशभरातील कोरोना संक्रमणाचा वेग बदलत आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात कोरोना संक्रमित रुग्ण आणि कोरोनामुळे होत असलेल्या मृत्यांच्या संख्येमागील कारणंही वेगवेगळी आहेत. त्यामुळे सगळ्या गोष्टींना एकाच तराजूत तोलता येणार नाही.
पुढे त्यांनी सांगितले की, ''आयसीएमआरकडून जानेवारी महिन्यापासूनच कोरोनाच्या प्रसाराबाबत अधिक माहिती मिळवली जात आहे. सध्याच्या स्थितीत लोकांनी सोशल डिस्टेंसिंगचं पालन करणं, साबणाने हात धुणं, मास्कचा वापर करणं गरजेचं आहे. आतापर्यंत भारतात दोन कोटींपेक्षा जास्त चाचण्या केल्या आहेत. सुरूवातीपासून भारतात वेगानं टेस्टिंग केले जात होते. टेस्ट केल्यामुळे लोकांचा जीव वाचवणं अधिक सोपं होत आहे.''
दरम्यान सीरम कंपनीला DCGI कडून दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्याच्या वैद्यकिय चाचणीसाठी परवानगी मिळाली आहे. या लसीचे नाव COVISHIELD (कोव्हिशिल्ड) असणार आहे. सीरम इंस्टिट्यूट कंपनी ऑक्सफर्डच्या तज्ज्ञांसोबत मिळून कोरोनावर लस तयार करणार आहे.वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार तिसऱ्या टप्प्यातील वैद्यकिय चाचणी सुरू करण्याआधी संबंधित माहिती केंद्रीय औषधी नियंत्रण संस्थेकडे (CDSCO) कडे जमा करावी लागणार आहे.
या माहितीचे मुल्यांकन (DSMB) च्या निरिक्षणाखाली करण्यात आलं आहे. या चाचणीत सामिल असलेल्या व्यक्तीला चार आठवड्यांच्या आत दोन डोस दिले जाणार आहेत. म्हणजेच पहिला डोस दिल्यानंतर 29 व्या दिवशी दुसरा डोस दिला जाणार आहे. या माध्यमातून सुरक्षिततेच्यादृष्टीने कोरोनाशी सामना करण्यासाठी लस किती प्रभावी ठरते हे पाहण्यात येईल.
WHO चा दणका! आता चीनची पोलखोल होणार; तज्ज्ञांनी शोधलं कोरोना विषाणूच्या प्रसाराचं मुळ
कोरोनाच्या 'या' औषधाच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीस सुरूवात; लवकरच औषध उपलब्ध होणार