नवी दिल्ली – कोरोना व्हायरस महामारीच्या दुसऱ्या लाटेच्या संकटातून अद्यापही भारत सावरला नाही तोवर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या शक्यतेने सरकारची चिंता वाढवली आहे. तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता केंद्र सरकार आणि राज्य सरकारने पूर्णपणे तयारी सुरू केली आहे. याच काळात केंद्र सरकारने कोरोना संक्रमित लहान मुलांच्या उपचारासाठी नवीन मार्गदशक सूचना जारी केल्या आहेत.
लहान मुलांच्या उपचारासाठी केंद्रीय आरोग्य विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या आरोग्य सेवा महानिर्देशालयाने या सूचना जारी केल्यात. DGHS ने विना लक्षण आणि सौम्य संक्रमित असणाऱ्या लहान मुलांवर स्टेरॉयडचा वापर करण्यावर बंदी आणली आहे. गाइडलायन्सप्रमाणे लहान मुलांवर याचा वापर हानिकारक होऊ शकतो. अशावेळी गंभीर स्थितीत त्याचा वापर केला जाऊ शकतो. मुलांसाठी केंद्र सरकारने लागू केलेल्या नव्या नियमांमुसार काही प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया.
कोरोना संक्रमित मुलांना रेमडेसिवीर दिले जाऊ शकते?
केंद्र सरकारने जारी केलेल्या नवीन मार्गदर्शक सूचनांमध्ये संसर्गग्रस्त मुलांना अँटी-व्हायरल रेमडेसिवीर देऊ नये, असे स्पष्टपणे सांगण्यात आले. डीजीएचएसने सांगितले की ३ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये त्याच्या वापराच्या परिणामांबद्दल पुरेसा डेटा उपलब्ध नाही. म्हणून त्याचा वापर टाळावा.
कोरोना संक्रमित मुलांवर स्टेरॉयडचा वापर केला जाऊ शकतो?
डीजीएचएसने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये असंही म्हटले आहे की, संसर्गाच्या लक्षणांनुसार आणि सौम्य प्रकरणांमध्ये स्टेरॉयड औषधांचा वापर हानिकारक आहे. म्हणूनच, मुलांसाठी स्टेरॉयडटा वापर टाळला पाहिजे.
गंभीर प्रकरणांमध्ये स्टेरॉयडचा वापर केला जाऊ शकतो?
डीजीएचएसने गंभीर आणि अत्यंत गंभीर प्रकरणांमध्ये रुग्णालयात दाखल केलेल्या मुलांच्या उपचारात केवळ कठोर देखरेखीखाली स्टेरॉयड औषधांचा वापर करावा असं म्हटलंय. 'स्टेरॉयड योग्य वेळी वापरलं जावं आणि योग्य डोस द्यावा आणि योग्य कालावधीसाठी द्यावा. स्वतःच स्टेरॉयडचा वापर टाळला पाहिजे.
मुलांची एचआरसीटी(HRCT) चाचणी करू शकतात का?
हाय रिझोल्यूशन सीटी (HRCT) स्कॅनच्या योग्य वापराची शिफारस करताना डीजीएचएसने असे सांगितले आहे की, छातीवरील स्कॅनमुळे उपचारांमध्ये फारच मदत होत नाही. अशा परिस्थितीत डॉक्टरांनी कोरोना रूग्णांमध्ये केवळ काही निवडक प्रकरणांमध्ये एचआरसीटी घेण्याचे ठरवावे.
ताप आल्यास मुलांना कोणते औषध दिले जाऊ शकते?
मार्गदर्शक सूचनांनुसार, सौम्य संसर्गाच्या बाबतीत ताप असल्यास पॅरासिटामोल 10-15 mg/kg/Dose दिला जाऊ शकतो. जर कफ असेल तर मोठ्या मुलांना सलाईनच्या गरम पाण्याने गुळण्या करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
मुलांची वॉक टेस्ट करण्यात यावी?
गाइडलायन्समध्ये मुलांसाठी ६ मिनिटांचा वॉक टेस्ट करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. १२ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांना पालकांच्या देखरेखीखाली ६ मिनिटांची वॉक टेस्ट देण्याचा सल्ला आहे. वॉक टेस्टमध्ये मुलाला त्याच्या बोटावर पल्स ऑक्सिमीटर ठेवून ६ मिनिटे सतत चालण्यास सांगितले जाते. यानंतर, त्याच्या ऑक्सिजन सॅच्युरेशन पातळी आणि पल्स रेट मोजले पाहिजे.
मुलांनी मास्क घालावा? जर होय, तर यासाठी काय नियम आहेत?
५ वर्ष किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या मुलांना मास्क घालण्याची आवश्यकता नाही. ६ ते ११ वर्षे वयोगटातील मुलांना मास्क घालू शकता तेदेखील केवळ पालकांच्या देखरेखीखाली असावं. तर १२ वर्षाचे किंवा त्याहून अधिक वयाच्या मुलांनी प्रौढांसारखेच मास्क परिधान करावेत
मुलांनीही आपले हात धुवून स्वच्छ केले पाहिजेत किंवा सॅनिटायझेशन केले पाहिजे?
होय, साबणाने आणि पाण्याने मुलांचे हात स्वच्छ धुतले पाहिजेत. मुलांचे हात स्वच्छ ठेवण्यासाठी अल्कोहोल बेस्ट सॅनिटायझर देखील वापरला जाऊ शकतो, परंतु त्याचा वापर काळजीपूर्वक आणि देखरेखीने देखील केला पाहिजे.