कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे आधीच ९ कोटींपेक्षा जास्त लोकांना संक्रमणाचा सामना करावा लागत आहे. आतापर्यंत १९ लाख लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून अलिकडे दिसून आलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे वैज्ञानिकांची चिंता वाढवली आहे. ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकेत कोरोना व्हायरसचे वेगवेगळे स्ट्रेन दिसून आले असून आता जपानमध्ये कोरोना व्हायरसचा नवीन स्ट्रेन सापडल्यानं पुन्हा एकदा भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. असं म्हटलं जात आहे की हा स्ट्रेन ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकेतील व्हायरसच्या स्वरूपापेक्षा वेगळा आहे. निक्केई एशियामधील वृत्तानुसार नवीन व्हायरस हे दोन जानेवारी रोजी ब्राझीलमधून जपानमधील हनेदा विमानतळावर उतरलेल्या प्रवाशांमध्ये आढळून आलं.
रिपोर्ट्सनुसार हे नवीन रूप ब्राजीलमधून आलेल्या लोकांच्या चाचणी अहवालानंतर दिसून आलं आहे. जपानच्या आरोग्य मंत्रालयानं रविवारी दिलेल्या माहितीनुसार हवाई मार्गावर चाचणीदरम्यान एकूण चार लोकांमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळून आला आहे. ज्यात जवळपास एक ४० वर्षीय पुरूष, ३० वर्षीय महिला आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे.
जपानी आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार हवाई मार्गावर पुरूषामध्ये कोणतेही संक्रमणाची लक्षणं आढळली नाहीत. पण त्यानंतर श्वास घेण्यासाठी त्रास होऊ लागला. जास्त त्रास झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आलं. तर दुसरीकडे कोरोनाच्या नव्या स्ट्रेननं संक्रमित असलेल्या महिलेला डोकेदुखी आणि तापाची समस्या उद्भवली होती. लहान मुलांमध्ये कोणतीही लक्षणं दिसून आली नाहीत.
चिंताजनक! महाराष्ट्रासह ८ राज्यात बर्ड फ्लूचा शिरकाव; प्रोसेस्ड चिकनवरही बंदी
माध्यमांच्या रिपोर्ट्सनुसार जपानमध्ये आधीपासूनच ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकेतील कोरोना व्हायरसचा नवा स्ट्रेन पसरला होता. या दोन्ही देशात जवळपास नवीन स्ट्रेनच्या ३० केसेस समोर आल्या होत्या. कोरोनाच्या नव्या स्ट्रेनच्या प्रसारामुळे शुक्रवारी टोकियो आणि आसपासच्या क्षेत्रात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. याअंतर्गत रेस्टॉरंट आणि बार रात्री आठनंतर बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
जपानमध्ये आढळलेल्या नवीन स्ट्रेनबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी शास्त्रज्ञ सातत्यानं प्रयत्न करत आहेत. आरोग्य तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार हा नवीन स्ट्रेन अधिक संक्रामक आहे. ब्राजीलचे आरोग्यमंत्री यांनी दिलेल्या माहितीनुसार त्या ठिकाणी सापडलेल्या कोरोनाच्या स्ट्रेनमध्ये १२ म्यूटेशन दिसून येत आहे. ज्यात एक ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकेतील स्ट्रेनप्रमाणे आहे.
चिंताजनक! .....तोपर्यंत कोरोना व्हायरसचा प्रसार वेगानं होत राहणार; WHO तज्ज्ञांचा इशारा
जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांनी सांगितले की, ''लोकांच्या सहयोगानं कोणत्याही परिस्थितीत या संकटातून बाहेर यायला हवं.'' रिपोर्ट्सनुसार जपानमध्ये आतापर्यंत ८० लाखांपेक्षा जास्त लोकांमध्ये कोरोना संक्रमणाची पुष्टी झाली आहे. आतापर्यंत चार हजारापेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला असून प्रतिदिवशी सात हजारांपेक्षा अधिक कोरोनाचे रुग्ण समोर येत आहे.