नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या चार कोटींवर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 949 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 6 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 5,21,743 लोकांना जीव गमवावा लागला आहे. कोरोना व्हायरसचा XE व्हेरिएंट शरीराच्या अवयवांवर नवीन मार्गाने परिणाम करत आहे. जुलाब, उलट्या, तापानंतर आता त्याचा फटका डोळ्यांनाही बसला आहे. वेगवेगळ्या लक्षणांसह कोरोनाचे रुग्ण डॉक्टरांसमोर येत आहेत.
विशेष म्हणजे कोरोनाची लक्षणे ही सामान्य आजारांसारखीच असतात, त्यामुळे त्यांना लगेच ओळखणे सोपं नसतं. हृदय, फुफ्फुसांनंतर आता कोरोना डोळ्यांवर अटॅक करतो आहे. कोरोनाच्या नवीन रुग्णांमध्ये डोळ्यांना संसर्ग झाल्याचं दिसू लागलं आहे. डोळ्यांमध्ये काही विशेष बदल किंवा अस्वस्थता असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका आणि ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. कोरोनाची डोळ्यांवर कोणती लक्षणे दिसतात ते जाणून घेऊया...
डोळ्यांवर 'असा' होतो परिणाम
डोळ्यांमध्ये वेदना
एंग्लिया रस्किन युनिव्हर्सिटीच्या रिपोर्टमध्ये असे समोर आले आहे की डोळा दुखणे हे कोरोनाचे लक्षण असू शकते. याशिवाय डोळ्यांना खाज येणे हे देखील त्याचे लक्षण असू शकते.
डोळे कोरडे होणे
कोरोनामुळे रुग्णाच्या डोळ्यात कोरडेपणाही दिसून येत आहे. डोळे दुखणे, डोळ्यातून पाणी येणं देखील कोरोनाचं लक्षण आहे. डोळे कोरडे होणं ही देखील एक सामान्य समस्या आहे, अशा परिस्थितीत दोन्हीमधील फरक सोपा नाही आणि फक्त कोरोना चाचणीद्वारेच शोधला जाऊ शकतो.
डोळे लालसर होणे
जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, डोळे लालसर होणं हे कोरोनाचं लक्षण आहे. एका संशोधनात असे आढळून आले आहे की, कोरोना व्हायरस आरएनए अश्रूंमध्ये आढळून आला आहे.
कोरोनाच्या सामान्य लक्षणांव्यतिरिक्त, जर तुम्हाला ही डोळ्यांशी संबंधित लक्षणे दिसली, तर डॉक्टरांशी संपर्क साधा आणि त्यांचा योग्य सल्ला घ्या. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.