कोरोना बरा झाल्यानंतरही त्याचे वेगवेगळे साईड इफेक्ट्स सातत्याने समोर येत आहेत. नव्याने समोर आलेल्या एका गोष्टीबाबत शास्त्रज्ञही चिंतेत आहेत. अमेरिकेतील ओरेगन स्टेट युनिव्हर्सिटीच्या अभ्यासातून असं समोर आलं आहे की, कोरोना संसर्गामुळे काही महिन्यांनंतर मानसिक आजारांचा (Mental disorders) धोका निर्माण होत आहे. संशोधकांचे म्हणणे आहे की, कोविड-19 संसर्गाच्या चार महिन्यांनंतर, श्वसनसंस्थेच्या इतर आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांपेक्षा इतर रुग्णांना मानसिक आजारांचा धोका 25 टक्के जास्त असल्याचे आढळून आले आहे.
नॅशनल कोविड कोहॉर्ट कोलॅबोरेटिव्ह (National Covid Cohort Collaborative) (N3C) कडील डेटा या नवीन अभ्यासासाठी वापरला गेला आहे. यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या 46,610 लोकांच्या डेटाची तुलना नियंत्रण गटातील रुग्णांशी करण्यात आली, ज्यांना श्वसन प्रणालीशी संबंधित इतर कोणत्याही प्रकारच्या आजारांनी ग्रासले होते. यामुळे कोविड-19 रुग्णांचे मानसिक आरोग्य समजणे सोपे झाले.
संशोधकांनी अभ्यासात सहभागी झालेल्यांचे मानसिक आरोग्य दोन वेळा तपासले. पहिली चाचणी संसर्गाच्या 21 ते 120 दिवसांच्या दरम्यान आणि दुसरी चाचणी 120 ते 365 दिवसांच्या दरम्यान करण्यात आली. या लोकांना यापूर्वी कोणताही मानसिक आजार नव्हता. विश्लेषणात, संशोधकांना आढळले की कोविड -19 रुग्णांमध्ये मानसिक आजारांचे प्रमाण 3.8 टक्के होते, तर श्वसन प्रणालीचे इतर आजार असलेल्या लोकांमध्ये ते केवळ 3.0 टक्के होते.
संशोधकांनी सांगितले की 0.8 टक्क्यांच्या या फरकामुळे मानसिक आजार होण्याचा धोका सुमारे 25 टक्के वाढतो. संशोधकांनी विशेषत: अभ्यासातील सहभागींमध्ये अस्वस्थता आणि मूड डिसऑर्डरचे विश्लेषण केले. यात असे आढळून आले की, दोन गटांतील सहभागांमध्ये जोखमीच्या पातळीत लक्षणीय फरक आहे. मूड डिसऑर्डरमध्ये लक्षणीय फरक नव्हता.
संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, कोविड-19 ची लागण झालेल्या प्रत्येक रुग्णाला अशा प्रकारची समस्या असेलच असे नाही, परंतु अशा धोक्यापासून सावध राहा आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांवर लक्ष ठेवा. त्यामुळे आरोग्य सेवेवर वेगळा दबाव वाढला आहे. ते म्हणाले की, मानसिक आजारांवर उपचार करण्यासाठी आपल्याकडे आधीच तज्ज्ञांची कमतरता आहे, त्यामुळे या बाबींकडे लक्ष न दिल्यास भविष्यात समस्या वाढणार आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.