नवी दिल्ली - देशात पुन्हा एकदा कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा चार कोटींवर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे नवे 2,827 रुग्ण आढळून आले आहेत. तर 24 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 5,24,181 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान रिसर्चमधून धडकी भरवणारी माहिती समोर आली आहे. कोरोना संसर्गातून बरं झाल्यानंतर दोन वर्षांनी देखील कोरोना रुग्णांची पाठ सोडत नसल्याचं समोर आलं आहे.
दोन वर्षांनंतरही जास्तीत जास्त लोकांमध्ये कमीतकमी एक तरी लक्षण आढळून येत आहे. सायन्स जर्नल लँसेटने केलेल्या रिसर्चमध्ये हे समोर आलं आहे. यामध्ये कोरोनातून बरं झाल्यानंतर दोन वर्षांनी 50 टक्के लोक असे आहेत ज्यांच्यामध्ये अद्याप एक तरी लक्षण दिसत असल्याचा दावा केला आहे. कोरोनातून ठीक झाल्यावरही शरीरावर त्याचा परिणाम होत आहे. लोक पुन्हा आपलं काम करत आहेत. पण लक्षणांचा सामना मात्र त्यांना करावाच लागत आहे.
लाँग कोविडच्या परिणामांबाबतची माहिती जमा करण्याची सध्या गरज आहे. जेणेकरून त्याचा धोका आपण कमी करू शकतो. लँसेटने हा रिसर्च वुहानच्या जिन यान-तान रुग्णालयातून कोरोनातून ठीक झालेल्या 2,469 रुग्णांवर केला आहे. हे रुग्ण उपचारानंतर बरे झाले. पण त्यातील 1192 रुग्ण असे होते जे गेल्या दोन वर्षांपासून आपल्या काही तक्रारी घेऊन डॉक्टरांकडे येत आहेत.
रिसर्चनुसार, रुग्णांना थकवा, अशक्तपणा जाणवत आहे. तर काहींमध्ये एंग्जायटी आणि डिप्रेशनचं लक्षणं पाहायला मिळत आहे. कोरोनातून ठीक झाल्यावर देखील अस्वस्थता जाणवत असल्याचं काही लोकांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. कोरोनाचा वेग मंदावत असतानाच काही राज्यात पुन्हा रुग्ण आढळून येत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.