जगभरात कोरोना पुन्हा पुन्हा डोके वर काढत आहे. भारतात कोरोनाचे नवे रुग्ण आटोक्यात असले तरी जगाला चिंतेत टाकणारी घटना घडली आहे. दक्षिण आफ्रिकेमध्ये कोरोनाचा नवा व्हेरिअंट सापडला आहे. या व्हेरिअंटमुळे आफ्रिकेत 22 जण संक्रमित झाले आहेत. यामुळे आफ्रिकेमध्ये मोठी खळबळ उडाली असून खासगी लॅबनादेखील या व्हेरिअंटच्या रुग्णांचा शोध घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हा नवा व्हेरिअंट अद्याप किती धोकादायक आहे हे समोर आलेले नाही.
दक्षिण आफ्रिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर कम्युनिकेबल डिसीज (NICD) नुसार हा व्हेरिअंट अधिक संक्रामक असू शकतो. या नव्या व्हेरिअंटला B.1.1.529 हे कोडनेम देण्यात आले आहे. सरकारी तसेच खासगी प्रयोगशाळांना सरकारने तातडीने जिनोम सिक्वेंन्सिंग करण्याचे आदेश दिले आहेत. हा व्हेरिअंट किती संक्रमक, धोकादायक आणि परिणामकारक आहे हे समजू शकेल.
एनआयसीडीचे कार्यवाहक कार्यकारी संचालक प्रा. एड्रियन पुरेन म्हणाले की, दक्षिण आफ्रिकेत नवीन व्हेरिअंट मिळाल्याने आम्हाला आश्चर्य वाटत नाही. सध्या डेटा खूपच मर्यादित असला तरी आमचे आरोग्य कर्मचारी आणि शास्त्रज्ञ सतत काम करत आहेत. या प्रकाराचा उगम कुठून झाला हे शोधण्याचा ते प्रयत्न करत आहेत. ते कुठे पसरले आणि किती नुकसान होऊ शकते? आम्ही लोकांना सतत सल्ला आणि इशारे देत आहोत, जेणेकरून ते कोरोनाचा संसर्ग टाळू शकतील.
पब्लिक हेल्थ सर्व्हिलन्स अँड रिस्पॉन्सचे प्रमुख डॉ. मिशेल ग्रूम यांनी सांगितले की, आश्चर्यकारक बाब म्हणजे पॉझिटिव्ह लोकांची संख्या आणि संसर्ग झालेल्या लोकांची संख्या झपाट्याने वाढत आहे. B.1.1.529 या प्रकाराची सर्वाधिक प्रकरणे गौतेंग, उत्तर पश्चिम आणि लिम्पोपो येथे नोंदवली गेली आहेत. मिशेल म्हणाले की, आम्ही देशभरातील एनआयसीडीसह सर्व राज्यांच्या आरोग्य प्रशासनाला सतर्क केले आहे.