नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोनाने शरीराचे कितपत नुकसान केले आहेत. याबाबत अनेक रिसर्च समोर येत आहेत. असाच एक रिसर्च समोर आला असून त्यातून धडकी भरवणारी माहिती मिळत आहे. राजकोटच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एक संशोधन करण्यात आलं आहे. कोरोनाने लोकांच्या किडन्या खराब केल्याचे आढळून आले आहे. श्वसनमार्गामध्ये गंभीर संसर्ग झाला. फुफ्फुसापर्यंत रक्त वाहून नेणाऱ्या धमनीमध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार होत असल्याचं रिसर्चमध्ये म्हटलं आहे. हे अशा लोकांसोबत अधिक घडले ज्यांना संसर्गामुळे रुग्णालयात दाखल करावे लागले. तसेच ज्यांचा संसर्ग कालावधी हा एक आठवडा किंवा त्याहून अधिक काळ आहे.
संशोधकांनी आपल्या अभ्यासासाठी 33 मृतदेहांचे पोस्टमॉर्टम केले. हे असे लोक होते ज्यांना कोरोना संसर्गामुळे आपला जीव गमवावा लागला. या लोकांच्या अवयवांचा अभ्यास करून कोरोनामुळे कोणत्या अवयवाला इजा झाली आहे, हे दिसून आले. या अभ्यासाचे नेतृत्व डॉ. हेतल क्यादा यांनी केले आहे. ते राजकोटच्या मेडिकल कॉलेजमध्ये कार्यरत आहे. या संशोधनाचे निष्कर्ष 'इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्च'मध्ये प्रसिद्ध झाले आहेत. त्यानुसार, कोरोनामुळे फुफ्फुस आणि श्वसनप्रणालीचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. हे नुकसान रुग्णालयांमध्ये अधिक झाले.
रिसर्चनुसार, 'कोरोना संसर्गामुळे रुग्णालयात दाखल झालेल्या अनेक रुग्णांची प्रकृती बिघडली. त्यांना ब्रॉन्कोनिमोनियाच्या रूपात श्वसन प्रणालीच्या गंभीर संसर्गाने गाठले होते. त्यांच्या फुफ्फुसात फोड आले होते. एवढेच नाही तर फुफ्फुसात रक्त वाहून नेणाऱ्या धमनीमध्ये रक्ताच्या गुठळ्या होत्या. हे सर्व घडले कारण त्यांना मशीनमधून बराच वेळ ऑक्सिजन दिला जात होता. टोसिलिझुमॅब आणि स्टेरॉइड्ससारख्या औषधांच्या वापरामुळे रुग्णांच्या किडनी आणि इतर अवयवांना गंभीर नुकसान झाले. इतकेच नव्हे तर रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या दबावामुळे रुग्णालयांना नियमितपणे संसर्गविरोधी व्यवस्था करणेही शक्य होत नव्हते. एवढे करूनही अनेक रुग्णांना वाचवता आले नाही.
'द इंडियन एक्स्प्रेस'नुसार, ज्या मृतदेहांवर रिसर्च करण्यात आला त्यामध्ये 28 पुरुष, 5 महिला होत्या. 7 सप्टेंबर ते 23 डिसेंबर 2020 दरम्यान त्यांचे निधन झाले होते. मृत्यूनंतर तीन तासांत त्याचे पोस्टमॉर्टम करण्यात आले. सर्वांचे वय 60 पेक्षा जास्त होते. त्यापैकी 30 जणांना ऑक्सिजन-सपोर्टची गरज होती. सर्व लोकांना 7 किंवा अधिक दिवस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 3,377 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 60 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 5,23,753 लोकांना जीव गमवावा लागला आहे.