नवी दिल्ली - वेगाने पसरणाऱ्या कोरोना व्हायरसने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. जगभरातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल तीन कोटींचा टप्पा पार केला असून एकूण रुग्णांची संख्या 36,391,057 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे तब्बल 1,060,443 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना व्हायरस उन्हात नष्ट होतो असा दावा याआधी काही संशोधनातून करण्यात आला होता. त्यानंतर आता हिवाळ्यात कोरोनाचा धोका आणखी वाढणार का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
हिवाळ्यात कोरोनाचा धोका वाढणार असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र जागतिक आरोग्य संघटनेनेच याबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे. तापमानाचा कोरोनावर काय परिणाम होतो याबाबत जगभरातील तज्ज्ञ आपलं मत मांडत आहेत. प्रामुख्याने हंगामी व्हायरस हे (Seasonal Virus) हिवाळ्याम्ध्ये सक्रिय होतात. जगभरातील अनेक भागांमध्ये हिवाळ्यामध्ये इन्फ्युएंझाचा प्रकोप वाढताना दिसतो. आतापर्यंत कोरोनाच्या ट्रेंडमध्ये काही विशेष फरक झालेला दिसत नाही.
फ्लू व्हायरसमुळे हिवाळ्यात सर्वाधिक मृत्यू
व्हायरसमुळे होणारे श्वसनयंत्रणेशी संबंधित आजार हे थंड तापमानात वाढतात. याच कारणामुळे फ्लू व्हायरसमुळे हिवाळ्यात सर्वाधिक मृत्यू होत असतात. त्यामुळेच कोरोनामुळे हिवाळ्यात अधिक लोकांचा मृत्यू होऊ शकतो अशी भीती अनेकांनी वर्तवली आहे. आतापर्यंत तापमानामुळे कोरोना व्हायरसच्या संसर्गात वाढ झाल्याचं स्पष्ट झालेलं नाही. भारतात एकूण सहा ऋतू असून हिवाळ्यात इन्फ्लुएंझाचा प्रकोप वाढताना दिसत नसून तो जून ते सप्टेंबर या काळात वाढतो असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.
एकाच ठिकाणी अधिक काळ राहणाऱ्या लोकांमध्ये व्हायरसच्या प्रसाराचा धोका अधिक
पश्चिमेकडील देशांमध्ये थंडीमुळे लोक घरांमध्येच अधिक काळ थांबतात. हे पाहता एकाच ठिकाणी अधिक काळ राहणाऱ्या लोकांमध्ये व्हायरसच्या प्रसाराचा धोका अधिक वाढतो. Virologists ने दिलेल्या माहितीनुसार, भारताच्या बाबतीत विचार करता अशी शक्यता दिसत नाही. भारतात हिवाळ्यात देखील लोक घराबाहेर पडतात आणि भारतीय घरांमध्ये नेहमीच हवा खेळती असते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. कोरोनाने जगभरात थैमान घातले आहे. रुग्णांच्या संख्येत वाढ होत असतानाच आता देशवासियांना थोडा दिलासा मिळत आहे. कोरोनाचा वेग काही राज्यात मंदावत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
गुड न्यूज! कोरोनाच्या लढ्यात आशेचा किरण; पॉझिटिव्हिटी रेटमध्ये वेगाने होतेय घट
कोरोनाच्या संकटात आता आनंददायक आणि दिलासादायक माहिती समोर आली आहे. बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. 56 लाख 62 हजार 491 लोक बरे झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून देशात दररोज आढळून येणाऱ्या नव्या रुग्णांच्या संख्येतही घट झाली आहे. यासोबतच गुड न्यूज म्हणजे देशाच्या पॉझिटिव्हिटी रेटमध्ये घट झाली आहे. 30 सप्टेंबर ते 6 ऑक्टोबर दरम्यान देशाचा पॉझिटिव्हिटी रेट 6.8 टक्के झाला आहे. तसेच एका आठवड्यात देशात तब्बल 80 लाख कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांमध्ये ही घट झालेली पाहायला मिळाली आहे. रिपोर्टनुसार, 2 ते 8 सप्टेंबरदरम्यान देशाचा पॉझिटिव्हिटी रेट 8.3 टक्के होता. 16 ते 22 सप्टेंबरदरम्यान हाच आकडा 9.2 टक्के झाला. त्यानंतर पॉझिटिव्हिटी रेट वाढताना दिसला.