कोरोना व्हायरसबाबत जगभरात वेगवेगळे संशोधन सुरू आहे. कोरोनाची लक्षणं आणि उपचार याबाबत संशोधनातून नवनवीन खुलासा होत आहे. टेस्टोस्टेरॉन हार्मोनचा स्तर कमी असल्यास मृत्यूचा धोका जास्त असतो. पण नवीन संशोधनातून समोर आलेल्या माहितीनुसार कोरोना व्हायरसमुळे पुरूषांमध्ये टेस्टोस्टेरॉनचा स्तर बिघडू शकतो. या स्थितीमुळे पुरूषांना रोगातून बाहेर येण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागतो. रिसर्च जर्नल 'द एजिंग मेल' मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या एका शोधानुसार जसजसं पुरूषांमध्ये टेस्टोस्टेरॉनचा स्तर कमी होतो. तसतसं आयसीयूमध्ये भरती होण्याची शक्यता जास्त असते.
संयुक्त अरब अमीरातच्या मेर्सिन विद्यापीठातील युरोलॉजीचे प्राध्यापक आणि प्रमख संशोधन सेलाहिटिन सियान यांनी दिलेल्या माहितीनुसार शरीरात टेस्टोस्टेरॉनचा स्तर कमी असल्यास कोरोनाचा धोका जास्त असतो. पण हा पहिलाच असा अभ्यास आहे. ज्यातून कोरोना संक्रमणामुळे पुरूषांच्या शरीरातील टेस्टोस्टेरॉनचा स्तर कमी होत असल्याचे दिसून आले आहे.
टेस्टोस्टेरॉनची महत्वाची भूमिका असते
टेस्टोस्टेरॉनचा स्तर कमी झाल्यास श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे जोखिम वाढते. म्हणून कोरोनाच्या संक्रमणातून बाहेर येण्यास वेळ लागू शकतो. कोणत्याही संक्रमणापासून बचाव करण्यासाठी तसंच रोगप्रतिकारकशक्ती चांगली ठेवण्यासाठी टेस्टोस्टेरॉनची भूमिका महत्वाची असते. या हार्मोनला सेक्स हार्मोन असंही म्हटलं जातं. टेस्टोस्टेरॉन हा हार्मोन आजारांशी लढण्यासाठी एंटीबॉडी तयार करण्यासाठी महत्वाचा मानला जातो.
वैज्ञानिकांनी २३२ पुरूषांसह ४३८ रुग्णांवर परिक्षण केले होते. त्यातील सगळेचजण कोरोना पॉझिटिव्ह होते. त्यातील ६५ रुग्णांमध्ये टेस्टोस्टेरॉनची कमतरता आढळून आली होती. तज्ज्ञांनी या रुग्णांच्या मेडिकल हिस्ट्रीबाबत सखोल माहिती घेतली. त्यानंतर संपूर्ण शारीरिक तपासणी आणि रेडिओलॉजिकल इमेजिंगचा अभ्यास केला. या अभ्यासातून दिसून आलं की, कोरोनाची गंभीरता वाढल्यामुळे शरीरात टेस्टोस्टेरॉनचा स्तरही कमी झाला होता.
वैज्ञानिक प्रा. सियान यांनी सांगितले की, आयसीयूमध्ये भर्ती करण्यात आलेले कोरोना रुग्ण आणि कोरोनामुंळे मृत्यू होत असलेल्या रुग्णांमध्ये टेस्टोस्टोरॉनचा स्तर कमी दिसून आला. टेस्टोस्टेरॉनच्या स्तरात सुधारणा झाल्यास रुग्णाला आजारातून बाहेर येण्यास मदत होऊ शकते.
कोरोना संकट काळात आणखी एका विषाणूचा प्रसार
आयसीएमआर वैज्ञानिकांनी कॅट क्यू व्हायरस (CQV) नावाचा एक विषाणू शोधून काढला आहे. या विषाणूमध्ये देशात रोगाचा प्रसार करण्याची क्षमता आहे. तसेच, हे विषाणू आर्थ्रोपॉड-जनित विषाणूंच्या श्रेणीमध्ये येतात. ते कुलेक्स नावाच्या डासांच्या व्यतिरिक्त डुकरांमध्ये देखील आढळतात. वृत्तानुसार, चीन आणि व्हिएतनाममधील लोक मोठ्या प्रमाणावर या सीक्यूव्ही विषाणूमुळे पीडित असल्याचे आढळले आहे. भारतात सुद्धा सीसीक्यूपासून होणारा रोग पसरण्याची शक्यता आहे.
भारतात दोन लोकांच्या सीरम नमुन्यांमध्ये अँटी-सीक्यूव्ही आयजीजी अँटीबॉडीज आढळले आहेत. आयसीएमआरच्या वैद्यकीय जर्नल आयजेएमआरच्या म्हणण्यानुसार, हे दोन्ही नमुने कर्नाटकात २०१४ आणि २०१७ मध्ये घेण्यात आले होते. आयसीएमआरच्या वैज्ञानिकांनी असा इशारा दिला आहे की, जर हा विषाणूचा प्रसार झाला तर सार्वजनिक आरोग्यावर संकट उद्भवू शकते.
दोन्ही व्यक्तींच्या सीरम नमुन्यांमध्ये अँटी-सीसीक्यू आयजीजी अँटीबॉडीज सापडल्यावर डासांमधील सीक्यूव्हीच्या रेप्लिकेशन म्हणजेच संख्या वाढविण्याच्या क्षमतेची तपासणी करण्यात आली. संशोधकांच्या मते, हे सूचित करते की, भारतात सीक्यूव्ही-जनित रोगाचा प्रसार होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत बचावात्मक पावले उचलणे आवश्यक आहे. विषाणूच्या प्रादुर्भावाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, जास्तीत जास्त लोकांना सीरमच्या नमुन्यांची तपासणी आणि चाचणी करणे आवश्यक आहे.