लंडन – चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे सगळ्या जगावर संकट उभं राहिलं आहे. कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी अद्यापही लस उपलब्ध झाली नाही. अशातच ब्रिटनमधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसचा नवा प्रकार समोर आला असल्याची माहिती आरोग्य सचिव मॅट हॅकॉंक यांनी दिली आहे.
इंग्लंडच्या दक्षिण पूर्व भागात कोरोनाचा नवा प्रकार वेगाने पसरत आहे. कोरोना व्हायरसचा नवा प्रकार सार्सकोव २(Sarscov2) चे आतापर्यंत १ हजाराहून अधिक रूग्ण आढळून आल्याची माहिती सोमवारी हाऊस ऑफ कॉमन्समध्ये देण्यात आली. मॅट हॅकॉंक यांनी सांगितले की, सध्या अस्तित्वात असलेल्या कोरोना व्हायरसच्या तुलनेत हा नवीन व्हायरस अत्यंत वेगाने लोकांमध्ये पसरत आहे. कोरोनाच्या नव्या प्रकारावर लस कितपत प्रभावी ठरेल याबाबत सध्या कोणताही पुरावा नाही. केंटमध्ये मागील आठवड्यात याचा पहिला रूग्ण आढळून आला होता असं त्यांनी सांगितले.
तसेच सार्सकोव २ हे गंभीर आजाराचं कारण होऊ शकतं याबाबत आता काहीही सांगता येत नाही, आरोग्य तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार कोरोना व्हायरसच्या नव्या प्रकारावर देशात देण्यात येत असलेली लस परिणामकारक न ठरण्याची शक्यता आहे असं मॅट यांनी सांगितले. त्याचसोबत पोर्टान डाऊन येथील केंद्रावर वैज्ञानिक या व्हायरसवर संशोधन करत आहेत. तर दुसरीकडे दक्षिण इंग्लंडमध्ये कोरोनाचे वाढते रूग्ण लक्षात घेता लंडन आणि हर्टफोर्डशायर, एसेक्सच्या काही भागात बुधवारी मध्यरात्रीपासून पुन्हा तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन लागू करण्यात येणार आहे.
तज्ज्ञांना याबाबत कोणतीही कल्पना नाही की, कोरोनाच्या नव्या प्रकाराचा प्रसार कुठपर्यंत झाला आहे. पण काहीही कारण असो आम्हाला वेगवान निर्णय घेण्याची गरज आहे. जोपर्यंत कोरोनाची लस सर्वांना देत नाही तोपर्यंत या जीवघेण्या महामारीचा प्रसार रोखणं सगळ्यात मोठं आव्हान असणार आहे. ब्रिटनने याबाबत जागतिक आरोग्य संघटनेला(WHO) माहिती दिली आहे. युनिवर्सिटी ऑफ एक्सेटरचे वरिष्ठ प्राध्यापक डॉ. भारत पंखानिया यांनी सांगितले की, कोरोना व्हायरसच्या नव्या प्रकारामुळे आमच्या लसीमध्ये कोणतेही बदल करण्याची गरज भासणार नाही असा विश्वास वाटतो