कोरोनाच्या माहामारीनं सगळ्यांनाच आपल्या जाळ्यात ओढलं आहे. त्यात लहान मुलं, वयस्कर लोक, मध्यम वयाची माणसं, तरूण या सगळ्यांचाच समावेश आहे. अनेकांवर कोरोनाशी सामना करता करता मृत्यूचं संकट ओढावलं तर अनेकांनी यशस्वीरित्या मात करून कोरोनाला हरवलं. आज आम्ही तुम्हाला कोरोनावर मात करणाऱ्या आजींबद्दल सांगणार आहोत. १०६ वर्षीय आजी या जीवघेण्या आजारातून सुखरुप बाहेर आल्या आहेत. त्यामुळे सगळ्यांनाच प्रेरणा मिळाली आहे.
कोरोना व्हायरसला हरवणाऱ्या या आजींचे नाव आनंदीबाई पाटील आहे. या आजी कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या कोविड रुग्णालयात भरती झाल्या होत्या. या रुग्णालयात त्यांच्यावर कोरोनाचे उपचार सुरू होते. कोरोना संक्रमणाचा सामना करून या घातक आजारातून पूर्णपणे बऱ्या झाल्यामुळे या आजींना रुग्णालयातून घरी पाठवण्यात आलं आहे. रुग्णालयातून आपल्याला डिस्चार्ज मिळणार हे कळताच या आजींचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्यांच्या चेहऱ्यावर एक विलक्षण आनंद यावेळी दिसून आला. त्यांचे हास्य पाहून रुग्णालयातील इतर कर्मचारी आणि डॉक्टरांनाही फार आनंद झाला. वृत्तसंस्था एएनआयनं या संबंधी ट्विट करत माहिती दिली आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील ट्वीट करून महापालिका प्रशासन व डॉ. राहुल घुले यांची प्रशंसा केली आहे.
दरम्यान वेगाने पसरणाऱ्या कोरोना व्हायरसमुळे जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जगभरातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल तीन कोटींचा टप्पा पार केला असून रुग्णांची संख्या 30,984,415 वर गेली आहे. तर 961,400 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी, लस शोधण्यासाठी जगभरात युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. अनेक ठिकाणी संशोधन सुरू असून नवनवीन माहिती ही सातत्याने समोर येत आहे.
रशियानं तयार केलं कोरोनाचं औषध 'कोरोनाविर'
रशियाची फार्मा कंपनी आर फार्मानं कोविड19 च्या उपचारांसाठी नवीन औषध तयार केलं आहे. हे एक नवीन एंटी व्हायरल औषध आहे. या औषधाला कोरोनाविर नाव देण्यात आलं असून वैद्यकिय चाचणीनंतर या औषधाला कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी परवागनी देण्यात आली आहे. रशियन कंपनीने केलेल्या दाव्यानुसार हे औषध कोरोना रुग्णांचे उपचार करण्यासाठी परिणामकारक ठरतं.
कोरोनाविर या औषधामुळे व्हायरसचे रेप्लिकेशन म्हणजेच संख्या वाढवण्यापासून रोखता येऊ शकतं. कंपनीनं केलेल्या दाव्यानुसार कोरोनाविर हे देशातील पहिले असे औषध आहे. ज्याद्वारे कोरोना रुग्णांचे उपचार केले जाऊ शकतात. जगभरातील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. अशा स्थितीत या औषधामुळे संक्रमित रुग्णांमध्ये व्हायरसची संख्या वाढण्यापासून रोखता येऊ शकतं.
५५ टक्के सुधारणा दिसून आली
आर फार्मा कंपनीने केलेल्या दाव्यानुासर क्लिनिकल ट्रायल दरम्यान कोरोनाविर आणि दुसरी थेरेपी घेत असलेल्या कोरोना रुग्णांमध्ये तुलना करण्यात आली. रिपोर्टमध्ये दिसून आले की दुसरी थेरेपी घेत असलेल्या रुग्णांच्या तुलनेत कोरोनाविर घेत असलेल्या रुग्णांमध्ये 55 टक्के सुधारणा दिसून आली. तज्ज्ञांनी केलेल्या दाव्यानुसार कोरोनाच्या लक्षणांपेक्षा या औषधानं आजाराच्या मुळावर घाव घातला जातो. हे औषध रुग्णांना दिल्यानंतर 14 दिवसांनंतर हा फरक दिसून आला. तज्ज्ञांनी केलेल्या दाव्यानुसार कोरोनाविर दिल्यानंतर पाचव्या दिवशी 77.5 टक्के रुग्णांच्या शरीरात कोरोना व्हायरसचं संक्रमण कमी झालं होतं.
आर फार्माचे वैद्यकिय प्रमुख डॉ. मिखायल सोमसोनोव यांनी सांगितले की, अनेक देशांमध्ये वैद्यकिय परिक्षणाला सुरूवात झाली आहे. कोरोविर कोरोनाचं संक्रमण आणि रेप्लिकेशन रोखण्यासाठी प्रभावी ठरत आहे. रशियाच्या सेंट्रल रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ एपिडेमियोलॉजीचे प्रमुख तात्यान रायदेनत्सोवा यांनी दिलेल्या माहितीनुसार मे महिन्यात या औषधांच्या चाचणीला सुरूवात झाली होती. आतापर्यंत ११० रुग्णांच्या उपचारांसाठी या औषधांचा वापर करण्यात आला आहे. या औषधाचे संशोधन अहवाल अजूनही प्रकाशित झालेले नाहीत. यावर तात्यान रायजेनत्सोवा यांनी कोणतीही माहिती दिलेली नाही.
हे पण वाचा-
तुम्हालाही अचानक BP चा त्रास होतो? तज्ज्ञांनी सांगितले 'बीपी' नियंत्रणात ठेवण्याचे सोपे उपाय
भारतातही कोरोनाची लस मोफत मिळणार? अमेरिकेने केली मोठी घोषणा
आरोग्यदायी दुधीच्या सालीचे 'हे' फायदे वाचाल; तर फेकून देताना १० वेळा विचार कराल
काळजी वाढली! अजून २ वर्ष कोरोनाच्या माहामारीपासून सुटका नाही; WHO च्या तज्ज्ञांचा दावा
मोठा दिलासा! कोरोनाच्या लढाईत शास्त्रज्ञांना यश; बनवलं कोरोनावर मात करणारं Ab8 औषध