एकीकडे जगभरातील वैज्ञानिक कोरोनावरील सुरक्षित लस तयार करण्यासाठी धडपडत आहेत, तर दुसरीकडे चीनने आधीच लसीची चाचणी पूर्ण न करता डोस हजारो लोकांना दिला आहे. एका खुलाशातून हे उघड झाले आहे. चिनी अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली आवश्यक सेवा, फार्मास्युटिकल कंपन्या, सुपर मार्केटचे कर्मचारी आणि शिक्षकांसमवेत धोकादायक भागात जाणाऱ्या लोकांवर तीन लसींचा वापर करण्यात आला आहे.
असे सांगितले जात आहे की, औपचारिक चाचण्यांमधून या लोकांवर लसींचा काय परिणाम होणार आहे, ते लवकरात लवकर शोधण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. चीनच्या या मोठ्या निर्णयामुळे जगभरातील शास्त्रज्ञ आश्चर्यचकित झाले आहेत. या चाचणीचा परिणाम म्हणून चीन आपली लस सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. मात्र, असे असले तरी चीन थेट हजारो लोकांच्या आरोग्याशी खेळत आहे, असे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.
मंजुरीशिवाय लोकांना लस दिल्यास त्याचे नकारात्मक परिणाम होऊ शकतात. लोकांमध्ये अँटिबॉडीज तयार न होता, त्यांना डोळ्यांच्या समस्या उद्भवण्याचा धोका वाढण्याची शक्यता असते, असे शास्त्रज्ञांनी सांगितले. सहसा संमतीनंतर लसींच्या चाचणीसाठी स्वयंसेवकांची निवड केली जाते. परंतु सर्वसमावेशक संमतीविना चीनमध्ये लसींचा वापर होण्याची शक्यता आहे.
ज्या कंपन्यांची लस दिली जात आहे, अशा कंपन्यांनी लोकांना बेकायदेशीर करारावर स्वाक्षरी करण्यास सांगितले आहे, जेणेकरून ते यासंदर्भातील माहिती बाहेर देऊ शकणार नाहीत. ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न येथील मर्डोक चिल्ड्रन रिसर्च इन्स्टिट्यूटचे बालरोग तज्ज्ञ डॉ. किम मुहोलँड यांच्या म्हणण्यानुसार, सर्वात मोठी चिंता म्हणजे चीनमधील लोक अशा लसींच्या चाचण्यांमध्ये भाग घेण्यास नकार देऊ शकत नाहीत.
दरम्यान, चीनमध्ये कोरोनावरील लस किती लोकांना देण्यात आली, हे अद्याप समजू शकलेले नाही. मात्र, हजारो लोकांना लसीचा डोस देण्यात आला आहे, असे चीनची सरकारी कंपनी सिनोफर्मने म्हटले आहे. तर दुसरीकडे, बीजिंगस्थित कंपनी सिनोव्हॅकने सांगितले की, शहरात दहा हजारपेक्षा जास्त लोकांना इंजेक्शन दिले गेले आहे. याव्यतिरिक्त तीन हजाराहून अधिक कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांनाही लस देण्यात आली आहे.