देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसून येत आहे. लसीकरणाला सुरूवात झाल्यानंतर लोकांमध्ये दिलासादायक वातावरण होतं पण पुन्हा कोरोना संसर्गाचं प्रमाण झपाट्यानं वाढल्यामुळे चिंताजनक स्थिती निर्माण झाली. यादरम्यान कर्नाटकची राजधानी बंगळुरूनं चिंतेत आणखी भर टाकली आहे. इथे दहा वर्षाखालील मुलं जास्त प्रमाणात कोरोनाच्या विळख्यात (Increasing Number of Corona Infection Among Childrens येत असल्याचं चित्र आहे. या वयोगटातील रुग्णांच्या संख्येत सातत्यानं वाढ होत आहे. या महिन्यात दहा वर्षाखालील ४७२ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. सोमवारपर्यंत हा आकडा ५०० पार जाण्याची शक्यता आहे.
तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मागील वर्षीपेक्षा जास्त मुलांना व्हायरसचा संसर्ग होत आहे. अनेक लहान मुलं आता बाहेर फिरण्यासाठी जात आहेत. त्यामुळे, प्रसार अधिक झपाट्यानं होत आहे. या महिन्यात आढळून आलेल्या ४७२ रुग्णांपैकी २४४ मुलं आहेत. तर मुलींची संख्या २२८ आहे. माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्नाटकमध्ये कोरोनासाठी गठीत करण्यात आलेल्या टेक्निकल अॅडव्हायजरी कमेटीच्या सदस्याच्या मते कोरोनाची वाढती संख्या पाहता सध्या चिंतेचं वातावरण तयार झालं आहे.
गेल्या वर्षी लहान मुलांमध्ये कोरोना संसर्गाचं प्रमाण अतिशय कमी होतं. कारण लोकं जास्त बाहेर फिरत नव्हते. लॉकडाऊनमुळे सगळे घरांमध्ये बंद होते. मात्र, आता मुलं बागेसह इतर ठिकाणी फिरायला जात आहेत तसंच अपार्टमेंटच्या खाली खेळण्यासाठी जात आहेत. त्यामुळे नकळतपणे मुलांमध्ये कोरोनाचा प्रसार जास्त प्रमाणात होत आहे.
मुलांकडून सोशल डिस्टेंसिंगचं पालन फारसं केलं जात नाही. लहान मुलं एकटे कुठे गेले नाही तरी पालकांसोबत गर्दीच्या ठिकाणी जेव्हा जातात तेव्हा धोका जास्त वाढतो. खबरदारीचा उपाय म्हणून मुलांना आपल्यासोबत कुठेही बाहेर नेऊ नये, गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं, कुठेही जाताना मास्क लावायला हवा. हात सतत स्वच्छ साबणानं धुवून राहायचे.
‘फायझर’कडून १२ वर्षांखालील मुलांवर लसीची चाचणी सुरू; यावर्षी दुसऱ्या सहामाहीत अहवाल अपेक्षित
दरम्यान गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली असून पुन्हा एकदा धडकी भरवणारी आकडेवारी समोर आली आहे. रुग्णसंख्येने रेकॉर्ड मोडला आहे. देशात शनिवारी कोरोनाचे तब्बल 62,714 नवे रुग्ण आढळून आले आहेत तर 312 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे देशातील रुग्णसंख्येने एक कोटीचा टप्पा पार केला आहे. एकूण रुग्णांची संख्या 1,19,71,624 वर पोहोचली आहे. तर देशात कोरोनामुळे आतापर्यंत 1,61,552 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात असताना कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. भारतातील कोरोना रुग्णांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर लाखो रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या ही सर्वाधिक आहे. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.