कोरोना व्हायरसचा प्रसार जगभरासह भारतात सुद्धा वाढत चालला आहे. कोरोनाची लागण होऊन जगभरातून दोन लाखांपेक्षा जास्त लोकांना मृत्यूचा सामना करावा लागला आहे. कोरोनाच्या प्रसार आणि परिणाम याबाबत नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे फुप्फुसांमध्येच नाही तर मेंदू आणि हृदयामध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार होत आहेत.
वुहानमधील कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचे शवविच्छेदन केल्यानंतर ही बाब समोर आली आहे. त्यामुळे जगभरातील इतर देशातील लोक सुद्धा सावध झाले आहेत. चीनसह इतर अनेक देशात कोरोना रुग्णांना रक्त पातळ करण्याचे औषध दिले जात आहे. जेणेकरून रक्ताच्या गुठळ्या होणार नाहीत. कारण शरीरातील रक्त गोठल्यामुळे हार्ट स्टोक, हार्ट अटॅक यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.
चीनी शास्त्रज्ञांनी केलेल्या रिसर्चनुसार रक्त गोठण्याचं प्रमाण कोरोना रुग्णामध्ये जास्त होतं. फुप्फुसं, मेंदू आणि हृदय या अवयवांमध्ये रक्त गोठण्याची समस्या उद्भवते. हा रिसर्च 'द लँसेंट’मध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. इटलीमध्ये सुद्धा असाच प्रकार कोरोना रुग्णांमध्ये दिसून आला. १८३ रुग्णांवर करण्यात आलेल्या रिसर्चनंतर या रुग्णांना रक्त पातळ करण्याचे औषध दिलं जावं असा सल्ला देण्यात आला आहे. ( हे पण वाचा- 'या' लोकांना कोलन संक्रमणाचा जास्त असतो धोका....)
भारतातील दिल्ली आणि मुंबईतील आरोग्य तज्ञांनी सुद्धा कोरोना रुग्णांना रक्त गोठण्याची समस्या निर्माण होत असल्याचे स्पष्ट केले आहे. आईसीएमआरकडून कोरोना रुग्णांना रक्त पातळ करण्याची औषधं देण्यासाठी परवानगी दिलेली नाही. आईसीएमआरमधील मुख्य तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार इतर देशांपेक्षा भारतातील कोरोना रुग्णांच्या संक्रमणाचे स्वरुप वेगळे आहे. यावर अधिक संशोधन सुरू असल्यामुळे रुग्णांच्या शारीरिक स्थितीबाबत परिणाम दिसून आल्यानंतर उपचारपद्धतीत बदल केला जाईल. ( हे पण वाचा-खुषखबर! आता लक्षणं नसतानाही डिटेक्ट होणार कॅन्सर; जाणून घ्या, कसा?)