कोरोना व्हायरसचा प्रसार होत असताना आता एक दिलासादायक माहिती समोर येत आहे. एका संशोधनातून दिसून आले की, कोरोना विषाणूंच्या संक्रमणातून बाहेर आल्यानंतर रुग्णांच्या शरीरात एंटीबॉडीज तयार होतात. त्यामुळे पुन्हा संक्रमण होण्याची शक्यता कमी असते. कोरोनाबाबत हा सकारात्मक दावा वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीतील तज्ज्ञांनी केला आहे. वायरोलॉजी लॅबमधील साहाय्यक निर्देशक एलेक्जेंडर ग्रेनिंजर आणि फ्रेड हच कॅन्सर रिसर्च सेंटरच्या संशोधकांनी याबाबत माहिती दिली आहे.
हा शोध सेरोलॉजिकल सर्वे आणि RT-PCR टेस्टद्वारे करण्यात आला होता. अमेरिकेतील सिएटलमधून एका मासे पकडत असलेल्या जहाजाची निवड करण्यात आली होती. या जहाजात एकूण १२२ लोकांचा समावेश होता. समुद्रात अठरा दिवसांच्या प्रवासासाठी निघण्यासाठी आधी आणि नंतर सगळ्यांच्याच चाचण्या करण्यात आल्या होत्या. या तपासणीदरम्यान तब्बल १०४ लोक संक्रमित असल्याचं दिसून आलं.
संपूर्ण जहाजात कोरोना विषाणूंचा प्रसार होऊनही तीन जणांना कोरोनाचं संक्रमण झालं नाही. कारण त्यांना आधीच एकदा कोरोनाचं संक्रमण झालं होत. त्यानंतर या संक्रमणातून पूर्णपणे बरे झाले होते. त्यामुळेच शरीरात एंटीबॉडीज तयार झाल्या होत्या. परिणामी हे तीनजण पुन्हा एकदा संक्रमीत होण्यापासून वाचले. तसंच कोणतीही लक्षणं दिसून आली नाहीत. या अभ्यासाचे लेखक एलेक्जेंडर यांनी हिंदूस्थान टाईम्सला दिलेल्या इमेलच्या माध्यमातून दिलेल्या माहितीनुसार एंटीबॉडी तयार होणं आणि कोविड १९ पासून होणारा बचाव या दोन्ही क्रिया एकमेंकाशी संबंधित आहेत.
या विषयावर अधिक संशोधन सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. हा अभ्यास प्रीप्रिंच सर्वर मेडरिक्समझध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. या अभ्यासातील निष्कर्षानुसार कोरोनाच्या माहामारीला रोखण्यासाठी रोगप्रतिकारकशक्तीची भूमिका महत्वाची असते. संपूर्ण जगभरात रोगप्रतिकारकशक्ती वाढवत असलेली लस तयार करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
दरम्यान कोरोनावर शोधून काढण्यात येणारी लस शंभर टक्के प्रभावी असण्याची शक्यता खूप कमी आहे. मात्र, ही लस ५० टक्के जरी प्रभावी असेल, तर एक वर्षाच्या आत जनजीवन पूर्वीप्रमाणे सुरळीत होईल, असे संसर्गजन्य रोगांचे अमेरिकेतील आघाडीचे तज्ज्ञ डॉ. अँथनी फौसी यांनी म्हटले आहे.
कोरोना साथीसंदर्भात राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे सल्लागार म्हणूनही फौसी सध्या काम पाहत आहेत. त्यांनी सांगितले की, पुढच्या वर्षीपर्यंत कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध होण्याची शक्यता आहे. त्यानंतर या साथीला प्रभावी आळा घालता येईल. त्यामुळे २०२१ च्या अखेरीपर्यंत जगातील जनजीवन पूर्वपदावर येण्याची शक्यता आहे. कोरोनाची लस विकसित झाली तरी हा विषाणू पृथ्वीतलावरून नष्ट होणार नाही, याची प्रत्येकाने नोंद घेतली पाहिजे. जगातून फक्त देवीचे विषाणू नष्ट करण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे. कोरोनाच्या लसीमुळे या विषाणूचे उपद्रव्यमूल्य कमी करता येईल.
हे पण वाचा-
..... तर २०२१ च्या शेवटापर्यंत कोरोनाची माहामारी पूर्ण नष्ट होणार; तज्ज्ञांचा दावा
युद्ध जिंकणार! शरीरात कोरोना विषाणूंची वाढ होण्यापासून रोखणार 'हे' नवीन औषध, तज्ज्ञांचा दावा
शेवटच्या टप्प्यात पोहोचली चीनी कंपनीची कोरोना लस; 'या' देशाला लसीचे डोस पुरवणार