नवी दिल्ली: कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे जगात भीतीचं वातावरण आहे. नव्या व्हेरिएंटच्या दहशतीमुळे शुक्रवारी जगभरातील शेअर बाजारांमध्ये मोठी पडझड झाली आहे. त्यामुळे जगाची अर्थव्यवस्था पुन्हा रुळावरून घसरण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ओमायक्रॉनचं संकट पाहता जगभरातील देशांची सरकारं कामाला लागली आहेत. नव्या व्हेरिएंटविरोधात दिग्गज फार्मा कंपन्यांनी कंबर कसली आहे.
कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटविरोधात पुढील २ आठवड्यात तपशील गोळा करण्यात येईल, अशी माहिती जर्मन फार्मा कंपनी बायोएनटेक एसईनं दिली आहे. बायोएनटेक एसईनं फायझरसोबत कोरोना प्रतिबंधात्मक लस तयार केली आहे. ती नव्या व्हेरिएंटविरोधात प्रभावी आहे का याचा अभ्यास २ आठवड्यांत करण्यात येईल. ओमायक्रॉन व्हेरिएंटविरोधात नव्या लसीची गरज असल्यास पुढील १०० दिवसांत तिची निर्मिती करण्यात येईल.
मॉडर्ना कंपनी कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटविरोधात बूस्टर लस तयार करत आहे. याशिवाय कंपनीकडून सध्याच्या बूस्टर डोसचंही परीक्षण सुरू आहे. विविध व्हेरिएंटपासून बचाव करण्यासाठी डिझाईन करण्यात आलेल्या दुसऱ्या बूस्टर लसीचा अभ्यासही करण्यात येत आहे. फायझर आणि बायोएनटेक पुढील ६ आठवड्यांत लसीचं रिडिझाईन करून १०० दिवसांच्या आत पहिली बॅच रवाना करू शकतात.
सध्याची लस कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटविरोधात उपयोगी ठरू शकत नाही, अशी शंका मॉडर्नाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी पॉल बर्टन यांनी व्यक्त केली. नवी लस नव्या वर्षांच्या सुरुवातीला उपलब्ध होऊ शकेल असा अंदाज त्यांनी वर्तवला.