सध्या कोरोनाच्या भीतीपोटी अनेक जण रोज मल्टी व्हिटॅमीनच्या गोळ्या घेत आहेत. औषध दुकानांवर या गोळ्यांचा खप प्रचंड वाढला आहे. व्हिटॅमीन डी व शाकाहारी लोकांना व्हिटॅमीन बी-१२, फोलिक अॅसिड सोडले तर इतर सर्व व्हिटॅमिन हे मुबलक प्रमाणात फळे, भाज्या, खाद्य पदार्थांमध्ये असतात. त्यामुळे तुम्ही स्वस्थ असाल व तुमचा आहार चांगला असेल तर तुम्हाला मल्टी व्हिटॅमीनच्या गोळ्यांची गरज नाही.
सध्या अशा मल्टी व्हिटॅमीन गोळ्याच्या जाहिराती ही वाढल्या आहेत. एक मोठा हिंदी चित्रपट स्टार जिंसिंगसह मल्टी व्हिटॅमीनच्या महागड्या गोळीची जाहिरात करतो, जी वारंवार दाखवली जात आहे. काही जाहिरीतींमध्ये आता ‘कोरोना’चे संदर्भ दिले जात आहेत. अशा जाहिरातींना कोणीही भुलू नये. बरेच जण व्हिटॅमीन सीच्या गोळ्यांचे ही सेवन करत आहेत.
तुम्ही रोज अर्धे लिंबू पाण्यात पिळून घेतले, तरी तुम्हाला पुरेसे व्हिटॅमीन सी मिळते. तसेच, चांगला आहार असणाऱ्यांच्या शरीरात व्हिटॅमीन सीचा साठा चांगला असतो म्हणून रोजच लिंबू पाण्यात घ्यायला हवे, असाही काही नियम नाही. आपण आपल्या नियमित आहारात अधूनमधून लिंबू पिळून घेतोच. तेवढेही पुरेसे ठरेल. तसेच प्रोटिन सप्लीमेंट्स घेण्याचीही गरज नाही. व्हिटॅमीन-डी मात्र सगळ्यांना घेण्याची गरज असते. हे सोडून दुसरी घेण्याची गरज पडू शकते अशी गोष्ट म्हणजे लोह म्हणजे आयर्न. डॉक्टरांच्या परवानगीने फक्तपुढील काही जणांना काही सप्लीमेंट्सची गरज पडू शकते.- लहान मुले : आयर्न, कॅल्शियम- गरोदर माता : फोलिक अॅसिड, आयर्न, कॅल्शियम- गुटखा, तंबाखू खाणारे :फोलिक अॅसिड- शाकाहारी : व्हिटॅमीन बी-१२- मद्यपान करणारे : फोलिक अॅसिड, व्हिटॅमीन बी-६, ए , थायमीन- मधुमेह, किडनीचे आजार आणि कॅन्सर : यांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार म्हणजेच आजार असले, तरी सर्वच नव्हे तर प्रत्येक आजाराप्रमाणे नेमक्या सप्लीमेंट्सची आवश्यकता असते. म्हणूनच नियमित आहार घेणाऱ्यांनी कुठले ही सप्लीमेंट्स घेण्याची गरज नाही. आजार असणाºयांनी आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने नेमकी औषधे घ्यावी.
- डॉ. अमोल अन्नदाते(लेखक बालरोगतज्ज्ञ असून वैद्यकीय साक्षरतेसाठी कार्यरत आहेत.)