मुंबई: जगभरात ओमायक्रॉनचा धोका वाढत आहे. आतापर्यंत ७७ देशांमध्ये ओमायक्रॉननं शिरकाव केला आहे. इतर व्हेरिएंटपैक्षा ओमायक्रॉनच्या प्रसाराचा वेग अधिक आहे. ब्रिटनमध्ये गुरुवारी कोरोनाचे विक्रमी ८८ हजार ३७६ रुग्ण आढळून आले. अमेरिकेतील ३६ राज्यांमध्ये ओमायक्रॉनचा शिरकाव झाला आहे. भारतातील ओमायक्रॉन बाधितांचा आकडादेखील वाढत आहे. सध्याच्या घडीला देशात ओमायक्रॉनचे ९७ रुग्ण आहेत.
ओमायक्रॉनच्या प्रसाराचा वेग अतिशय जास्त आहे. त्याचा प्रसार रोखायचा असल्यास त्याची लक्षणं समजून घेणं गरजेचं आहे. ओमायक्रॉनमुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या जास्त नाही. मात्र या व्हेरिएंटचा प्रादुर्भाव पसरण्याचा वेग चिंताजनक आहे. ओमायक्रॉन रुग्णांमध्ये आतापर्यंत एक समान लक्षण दिसून आलंय आणि ते म्हणजे घशात जाणवणारी खवखव.
ओमायक्रॉन पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये आढळून येणाऱ्या लक्षणांचा पॅटर्न वेगळा असल्याचं दक्षिण आफ्रिकेच्या डिस्कव्हरी हेल्थचे सीईओ डॉ. रेयान नोच यांनी सांगितलं. 'सर्व रुग्णांना सुरुवातीला घशात खवखव जाणवते. त्यानंतर त्यांचं नाक बंद होतं. कोरडा खोकला येतो. मांसपेशी दुखू लागतात. पाठीच्या खालच्या भागात वेदना होतात. ही सर्व लक्षणं सौम्य स्वरुपाची आहेत. मात्र याचा अर्थ ओमायक्रॉन धोकादायक नाही असा होत नाही,' असं नोच म्हणाले.
ब्रिटिश आरोग्य तज्ज्ञांनीदेखील नोच यांनी दिलेल्या माहितीबद्दल सहमती दर्शवली. ओमायक्रॉन आधीच्या व्हेरिएंटच्या तुलनेत वेगळा असल्याचं सर जॉन बेल यांनी बीबीसीला सांगितलं. 'ओमायक्रॉनची लक्षणं आधीच्या व्हेरिएंटपेक्षा वेगळी आहेत. बंद नाक, घशात खवखव, मांसपेशींमध्ये वेदना, अतिसार अशी लक्षणं आढळून आली आहेत. त्याकडे सर्वांनीच लक्ष देण्याची गरज आहे,' अशी माहिती बेल यांनी दिली.