राज्यात कोरोनाच्या लाटेनं कहर केला आहे. कोरोनाची दुसरी लाट आता कधी ओसरणार? लोकांना आधीसारखे जीवन कधीपासून जगता येणार? असे प्रश्न अनेकांच्या मनात आहेत. दरम्यान कोरोनाच्या प्रसाराबाबत सकारात्मक माहिती समोर येत आहे. राज्याच्या टास्क फोर्सचे सदस्य डॉ. तात्याराव लहाने यांनी दिलेल्या माहितनुसार काही दिवसातच कोरोनाचा प्रसार राज्यात थांबताना दिसेल.
राज्यात रविवारी रुग्णांची संख्या ५६ हजार संख्या होती, ही संख्या अशीच स्थिर राहिली किंवा खाली येऊ लागली तर आलेख खाली येतोय असं म्हणावे लागेल. कोरोना १६ फेब्रुवारी रोजी अमरावतीत आला. जगातील इतर देशांच्या अभ्यासानुसार कोरोना ९० दिवसांनी कमी होत असतो. त्यामुळे १५ मे ते २५ मे च्या दरम्यान कमी होताना दिसेल. असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.
त्यांनी सांगितले की,'' देशात ५ नव्हे तर १ हजार स्ट्रेन आढळले आहेत. आपल्याला फक्त हे बघायचं आहे की हा स्ट्रेन जास्त संसर्ग वाढवणारा आहे का? तो शरीरावर जास्त परिणाम करणारा आहे का? असे स्ट्रेन प्रत्येक ३ महिन्यांनी आढळतात. त्यामुळे या नव्या स्ट्रेनचा अभ्यास सध्या सुरू ठेवला आहे. साधारणपणे पहिल्या लाटेत ५० वयाच्या वरील लोकांना संक्रमण झालं होतं. दुसर्या लाटेत तरूण लोक जास्त प्रमाणात संक्रमित दिसून येत आहेत. वाढता धोका लक्षात घेता आता १८ वर्षापर्यंत लसीकरण होणार आहे, त्यामुळे त्यांना संरक्षण मिळणार आहे. राहिलेले १२ ते १८ वयोगटातील मुलं तिसर्या लाटेत बाधीत होतील.'' अशी शक्यता त्यांनी माध्यामांशी बोलताना व्यक्त केली.
भारतात हाहाकार माजवतोय कोरोनाचा इंडियन व्हेरियंट; जाणून घ्या, प्रभावी ठरेल का लस?
दरम्यान काही दिवसांपूर्वी फोर्सच्या सदस्यांनी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली होती. साथीच्या रोगांमध्ये व्हायरसची ताकद सतत वाढत असते. व्हायरस आपल्यात बदल करत असतो. यामुळे कोरोनाच्या आणखी किती लाटा येतील हे आज सांगू शकत नाही. कितीही लाटा आल्या तरीही महाराष्ट्र खंबीर आहे. पुरेशी तयारी आहे. कोरोनाविरोधात लढण्यासाठी आपण तयारी केली आहे, असे लहाने म्हणाले होते.
कोरोनाच्या जीवघेण्या लाटांपासून अखेर कधी मिळणार सुटका?; समोर आली दिलासादायक माहिती...
राज्यात आता उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या सात लाखांवर गेली असली तरीही सरकारने ऑक्सिजन, बेड आणि व्हेंटिलेटरची योग्य व्यवस्था केलेली आहे. कोरोना रुग्णांचे आकडे लपवायचे नाहीत, असे आम्हाला आदेश आहेत. एखाद्याचा अपघाती मृत्यू झाला आणि तो कोरोनाबाधित असेल तर त्याचा मृत्यू कोरोनाबाधित म्हणूनच दाखविला जातो. कोणतीही लपवाछपवी केली जात नसल्याचे तात्याराव लहाने यांनी स्पष्ट केले होते.