कोरोना व्हायरसचा (Corona virus) ओमायक्रॉन व्हेरिअंट (Omicron Variant) आधीच्या डेल्टा व्हेरिअंटच्यातुलनेत किती धोकादायक आहे? यावर अद्यापही मंथन सुरूच आहे. यातच, ओमायक्रॉनसंदर्भात लसीवर एक अध्ययन करण्यात आले आहे. हे अध्ययन फायझर लसीवर दक्षिण आफ्रिकेतील आफ्रिका हेल्थ रिसर्च इंस्टिट्यूटने केले आहे. या अध्ययनात दावा करण्यात आला आहे, की फायझर लसीचे दोन डोस ओमायक्रॉनविरोधात काही प्रमाणावरच प्रभावी आहेत. (Pfizer BioNTech effectiveness against Omicron)
या अभ्यासात आणखी एक गोष्ट समोर आली आहे की, ज्या लोकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले होते आणि ज्यांना आधी संसर्ग झाला होता, अशा लोकांच्या बहुतेक प्रकरणांमध्ये ओमायक्रॉन व्हेरिअंट निष्प्रभ ठरला. लसीचा बूस्टर डोस या व्हेरिअंटपासून संरक्षण करू शकतो, असेही या अभ्यासातून सुचविण्यात आले आहे. आफ्रिकेच्या हेल्थ रिसर्च इन्स्टिट्यूटचे प्रोफेसर अॅलेक्स सिगल यांनी ट्विट करत म्हटले आहे, की ओमायक्रॉन व्हेरिअंटच्या न्यूट्रलायझेशनमध्ये मोठी घट दिसून आली आहे. जी पूर्वीच्या कोविड स्ट्रेनपेक्षा अधिक आहे.
त्यांनी म्हटले आहे, की फायझर/बायोटेकची लस घेतलेल्या 12 लोकांच्या रक्ताची प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आली. यांतील, लसीचा डोस घेतलेल्या आणि कोरोनाच्या पूर्वीच्या व्हेरिअंटची लागण झालेल्या 6 पैकी 5 लोकांनी ओमिक्रॉन व्हेरियंटला निष्प्रभ केले. एवढेच नाही, तर सिगल म्हणाले, मी जो विचार करत होतो, त्या तुलनेत जे निकाल आले आहेत ते खूपच सकारात्मक आहेत. आपल्याला जेवढी अँटीबॉडी मिळेल, ओमायक्रॉनचा सामना करण्याची संधी तेवढीच वाढेल.
तसेच, ज्या लोकांना लसीचा बुस्टर डोस मिळाला आहे, अशा लोकांची अद्याप प्रयोग शाळेत तपासणी झाली नाही. असे लोक अद्याप दक्षिण आफ्रिकेत नाही, असेही सिगल यांनी म्हटले आहे.