लंडन : ए रक्तगटाच्या लोकांना कोरोनाचा संसर्ग इतरांच्या तुलनेत लगेचच होण्याची शक्यता असते. मात्र, ओ रक्तगटाच्या लोकांना या विषाणूची बाधा होण्याचा धोका तुलनेने कमी असतो. युरोपमधील हजारो कोरोना रुग्णांच्या गुणसूत्रांचा अभ्यास केल्यानंतर शास्त्रज्ञांनी हा निष्कर्ष काढला आहे.यासंदर्भात, न्यू इंग्लंड जर्नल आॅफ मेडीसिन या नियतकालिकामध्ये बुधवारी एक लेख प्रसिद्ध झाला आहे. याच विषयावरचा चीनमधील पाहणीचा एक लेख याआधी या नियतकालिकात प्रकाशित झाला होता. मात्र, कोरोना संसर्ग व रक्तगटातील संबंध यांचा संबंध त्यातून पुरेसा प्रस्थापित करता येत नव्हता. मेडिकल कॉलेज आॅफ विल्किन्सिनमधील रक्त या विषयाचे तज्ज्ञ डॉ. परमेश्वर हरी यांनी सांगितले की, युरोपमधील पाहणीनंतर कोरोना संसर्ग व रक्तगटाच्या संबंधांबाबत विश्वासार्ह पुरावे मिळाले आहेत. मात्र या विषयाबाबत इतर शास्त्रज्ञांनी सावध भूमिका घेतली आहे.सॅन दिएगो येथील स्क्रिप्स रिसर्च ट्रान्सलेशनल इन्स्टिट्यूटचे प्रमुख डॉ. एरिक टोपोल यांनी सांगितले की, रक्तगटामुळे कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका कमी होतो हा सिद्धांत संदिग्ध आहे. या विषयावर आणखी खूप काम होणे आवश्यक आहे.निरोगी, रुग्णांचा तुलनात्मक अभ्यासइटली, स्पेन, डेन्मार्क, जर्मनी व अन्य देशांमधील प्रकृती चिंताजनक बनलेले २ हजार कोरोना रुग्ण व या आजाराची कोणतीही लक्षणे आढळून न आलेले किंवा संसर्ग न झालेले काही हजार लोक यांच्या गुणसूत्रांचा अभ्यास शास्त्रज्ञांनी केला. कोरोनाची लागण झाली की काही जण खूप आजारी पडतात तर काही जणांना फार त्रास होत नाही, असे का होत असावे याचाही शास्त्रज्ञ अभ्यास करत आहेत.
CoronaVirus News: 'या' रक्तगटाच्या लोकांना कोरोना संसर्गाचा धोका कमी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2020 3:53 AM