कोरोनाप्रतिबंधक लसींचे दोन डोस घेऊनही कोरोनाने गाठल्याची अनेक उदाहरणे सध्या अमेरिकेत आढळून येत आहेत. तज्ज्ञांनी याची तीन कारणे सांगितली आहेत. एक म्हणजे कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचा झपाट्याने होत असलेला फैलाव, लसीकरणाची मंद गती आणि कोरोनानियमांचे उल्लंघन. भारतात तर या तीनही गोष्टींचा अमेरिकेपेक्षा कैक पटींनी अभाव आहे.
लसीकरणानंतरही संसर्ग कसा होतो?कोरोनाप्रतिबंधक लस घेतलेली व्यक्ती डेल्टा व्हेरिएंटच्या संपर्कात आल्यास लसीमुळे तयार झालेली प्रतिकारशक्ती विषाणूला रोखण्यात अपयशी ठरते. म्हणूनच लसीकरणाचा वेग वाढवणे गरजेचे आहे. लसीचे दोन्ही डोस मिळालेल्यांची संख्या वाढणेही अत्यावश्यक आहे. लसीकरणानंतर अँटिबॉडी मोठ्या संख्येने निर्माण होणे गरजेचे असते. त्यासाठी काही कालावधी जाऊ द्यावा लागतो. तसे न झाल्यास कोरोना संसर्ग होण्याची शक्यता बळावते. ज्यांचे लसीकरण झालेले नाही अशा लोकांच्या निष्काळजीपणामुळेही संसर्ग वाढत आहे. त्यामुळे अशा लोकांनी मास्क लावणे, गर्दी टाळणे, अंतरनियम पाळणे, हात निर्जंतुक करणे इत्यादी गोष्टींचे काटेकोर पालन करायला हवे.
अमेरिकेच्या तुलनेत भारतात काय स्थिती?
भारतात सध्या दैनंदिन रुग्णसंख्या घटली असली तरी जे कोरोनाबाधित सापडत आहेत त्यांच्यापैकी ८७ टक्के रुग्ण डेल्टा व्हेरिएंटचे आहेत. अमेरिकेत आतापर्यंत ४९ टक्के लोकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. भारतात मात्र हे प्रमाण ८ टक्के आहे. ज्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे अशा लोकांना अमेरिकेत कोरोना नियमांत सूट देण्यात आली आहे. तिथे टाळेबंदीही मागे घेण्यात आली आहे. भारतात मास्कबंदीमध्ये अजून तरी सूट देण्यात आलेली नाही. परंतु केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या डेटानुसार मास्कधारींची संख्या कमी झाली आहे.
तज्ज्ञांचे म्हणणे...जगातली कोणतीही कोरोनाप्रतिबंधक लस १०० टक्के परिणामकारक नाही. लस ही एक छत्री आहे. जी पावसापासून वाचवू शकते परंतु वादळापासून नाही. लस सीटबेल्टसारखीच आहे. म्हणजे सीटबेल्ट लावला असला तरी खबरदारी घेऊनच ड्रायव्हिंग करावे लागते. तद्वत लस घेतली असली तरी कोरोनाची लागण होणार नाही, याची काळजी घ्यावीच लागेल.