नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव अद्याप संपलेला नाही. देशात कोरोनाची आलेली दुसरी लाट मोठी होती. यानंतर आता तिसरी लाट (Coronavirus Third Wave) येणार असल्याचे सांगितले जात आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आता मुलांसाठी लस (Vaccine for Children) तयार करण्यात येत आहे. या मुलांच्या कोरोना लसीची सध्या चाचणी सुरु आहे.
या लसीच्या चाचणीबद्दल एक चांगली बातमी आहे. इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, चाचणीत सामील असलेल्या 6 ते 12 वयोगटातील मुलांना पुढील आठवड्यात कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस दिला जाऊ शकतो. भारत बायोटेकच्या या लसीची चाचणी एम्समध्ये सुरू आहे. दरम्यान, चाचणीत भाग घेतलेल्या 6 ते 12 वर्षे वयोगटातील मुलांना कोव्हॅक्सिनचा पहिला डोस देण्यात आला आहे. दुसरीकडे, पुढच्या आठवड्यात चाचणीत सामील झालेल्या 2 ते 6 वयोगटातील मुलांना लसीचा दुसरा डोस दिला जाणार आहे.
याआधी एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सप्टेंबरपर्यंत ही लस मुलांसाठी उपलब्ध होईल, अशी शक्यता वर्तविली होती. कोरोनाच्या तिसर्या लाटेचा इशारा दिल्यानंतर 12 मे रोजी सब्जेक्ट एक्सपर्ट कमिटीने मुलांवर कोव्हॅक्सिनची चाचणी करण्याची शिफारस केली होती. त्यानंतर गांभीर्य व परिस्थितीचा विचार करून ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (DCGI) चाचणीला मंजरी दिली होती.
झायडस कॅडिलाने सुद्धा तयार केली लसया आठवड्याच्या सुरूवातीला केंद्र सरकारने दिल्ली उच्च न्यायालयात सांगितले की, 18 वर्षांखालील मुलांसाठी असलेल्या कोरोना लसींच्या मानवी चाचण्या पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. गुजरातमधील औषधी कंपनी झायडस कॅडिला यांनी सांगितले आहे की, 12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांसाठी औषधाची चाचणी घेण्यात आली आहे, ती 18 वर्षांपर्यंतच्या मुलांना दिली जाऊ शकते. औषध कंपनी झायडस कॅडिलाने 1 जुलैला कोरोनाची लस ZyCoV-D (तीन डोस) चे आपत्कालीन वापरासाठी ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियासमोर मागणी केली होती. दोन डोसच्या लसीच्या मूल्यांकनाचा डेटा त्यांनी सादर केला. हा डेटा 28000 स्वयंसेवकांवर घेण्यात आलेल्या फेज -3 चाचणीचा निकाल होता.
कोरोनाची तिसरी लाट कमी धोकादायक असेल, IIT कानपूरचा दावादेशात कोरोनाची आलेली दुसरी लाट मोठी होती. यानंतर आता तिसरी लाट येणार असल्याचे सांगितले जात आहे. दुसऱ्या लाटेदरम्यान उद्भवलेली परिस्थिती पुन्हा तिसऱ्या लाटेत येऊ नये आणि त्यावर मात करण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान, अशा परिस्थितीत आयआयटी कानपूरच्या प्राध्यापकांनी एक दिलासादायक माहिती दिली आहे. आयआयटीचे प्रोफेसर मनिंद्र अग्रवाल यांनी गणिताच्या विश्लेषणाच्या 'फॉर्म्युला'च्या आधारे दावा केला आहे की, तिसरी लाट दुसर्या लाटेपेक्षा कमी धोकादायक असेल. तसेच, ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान तिसरी लाट येण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.