संदीप शिंदे
मुंबई : कोरोना उपचारांच्या खर्चाची दहशत कमी करण्यासाठी आयआरडीएआयने कोरोना कवच आणि कोरोना रक्षक या दोन पॉलिसी १० जुलैपर्यंत उपलब्ध करून देण्याचे निर्देश विमा कंपन्यांना दिले आहेत. त्या पॉलिसींची मार्गदर्शक तत्त्वे इन्शुरन्स रेग्युलेटरी अॅथॉरिटी आॅफ इंडियाने (आयआरडीएआय) जाहीर केली आहेत. विमाधारकांचा खिसा कापणाऱ्या पीपीई किटच्या खर्चाचा परतावा नव्या कवच पॉलिसीतून मिळेल. तसेच, उपचार खर्चाच्या बिलांना कोणत्याही प्रकारची कात्री लावण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
कोरोना कवच ही सिंगल प्रीमियम तत्त्वावरील पॉलिसी असली तरी तो प्रीमियम आयआरडीएआयच्या निकषांचे उल्लंघन करणारा नसावा. तसेच, भौगोलिक ठिकाणानुसार त्यात बदलाची मुभा नसेल. त्यामुळे कोरोना प्रभावित क्षेत्रांसाठी जास्त प्रीमियम आकारणे विमा कंपन्यांना शक्य होणार नाही. याशिवाय गंभीर आजार असलेल्या रुग्णांनाही ही पॉलिसी द्यावी लागेल. वैद्यकीय सेवांमध्ये सक्रिय असलेल्यांना पाच टक्के सवलतीच्या दरात ती मिळेल.
या पॉलिसीत कोरोनासह अन्य एक पर्यायी कव्हर घेण्याची मुभा असेल. कुटुंबासाठी किंवा वैयक्तिक स्तरावर १८ ते ६५ वयोगटांतील लोकांना ती घेता येईल. पालकांवर अवलंबून असलेल्या मुलांचाही त्यात समावेश करता येईल. किमान १२ महिन्यांच्या मुदतीचे निकष बाजूला ठेवून कवच आणि रक्षा या दोन्ही पॉलिसींसाठी साडेतीन, साडेसहा आणि साडेनऊ महिन्यांसाठी उपलब्ध असतील. कवच या पॉलिसीत ५० हजार ते पाच लाख तर रक्षक पॉलिसीत ५० हजार ते अडीच लाखांपर्यंतचे कव्हर असेल. रक्षक पॉलिसी वैयक्तिक पातळीवरच काढता येईल. त्यातले निर्बंध जास्त आहेत. किमान तीन दिवस रुग्णालयात दाखल व्हावे लागले तरच १०० टक्के कव्हर मिळेल. ते संपल्यानंतर पॉलिसी संपुष्टात येईल.घरगुती उपचार खर्चांचा परतावाविमा पॉलिसीच्या क्लेमसाठी २४ तास रुग्णालयांत अॅडमिट असण्याचे बंधन आहे. परंतु, डॉक्टरांनी कोरोना रुग्णाला घरी राहून उपचार करण्याचा सल्ला दिला असेल तर त्या खर्चाचा परतावा नव्या पॉलिसीतून मिळेल. तपासण्या, औषधे, कन्सल्टिंग आणि नर्सिंग चार्ज, आॅक्सिमीटर, आॅक्सिजन सिलिंडर आणि नेब्युलायझर्सच्या खर्चाचा त्यात समावेश असेल. मात्र, त्यासाठी काही अटी-शर्ती आहेत.क्लेमच्या कात्रीवर लगामकोरोना रुग्णांवर उपचार करताना पीपीई किटचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. परंतु, हे किट कन्झुमेबल गुड्समध्ये मोडत असल्याने त्या खर्चाचा परतावा दिला जात नाही. त्यामुळे बिलांच्या रकमवेर अनेकदा २० ते ३० टक्के कात्री लावली जाते. परंतु, नव्या कोरोना कवच पॉलिसीत पीपीई किटसह ग्लोव्हज्, मास्क यासारख्या अन्य कन्झुमेबलचाही परतावा मिळेल. एवढेच नव्हे तर अन्य कोणत्याही प्रकारच्या खर्चाला कात्री लावण्यास मज्जाव केला आहे. कोविडच्या तपासण्या, रुग्णालयांतील उपचार, रूम आणि नर्सिंग चार्जेस, सर्जन, अॅनेस्थेशिया, डॉक्टर, कन्सल्टंट, स्पेशालिस्ट यांची फी, आॅपरेशन थिएटर, व्हेंटिलेटर्स, औषधे या सर्वांच्या परताव्याची तरतूद त्यात असेल. रुग्णवाहिकांच्या खर्चापोटी २ हजार रुपये मिळू शकतील. तर, रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी १५ दिवस आणि डिस्चार्जनंतरच्या एक महिन्यातील औषधोपचारांच्या खर्चाचा परतावाही देण्याची तरतूद नव्या धोरणात आहे.